आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disinherit Infant News In Marathi, Disinherit Infant Found At Solalpur Railway Station, Divya Marathi

फलाटावर बेवारस अर्भकाला ‘तिने’ हृदयाशी धरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत पडलेल्या तान्ह्या बाळाच्या रडण्याने तेथील प्रवासी महिलेला ममतेचा पान्हा फुटला आणि तिने त्या चिमुरडीला हृदयाशी धरले. मायेच्या उबेने ती छकुली रडायची शांत झाली. त्याच वेळी संशयित स्थितीत आढळलेल्या महिलेने मात्र आई म्हणवून घेण्यास नकार दिला. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सकाळी 11.20 वाजता मुंबई नागरकोईल एक्स्प्रेस गाडी सोलापूर स्थानकात दाखल झाली आणि 15 मिनिटांनी गेलीही. दरम्यान, या फलाटावर कोणीतरी एक जण4 दिवसाचे बाळ ठेवून गेले. काहीवेळ हे बाळ तसेच पडून होते. कापडात गुंडाळलेले असल्याने त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. बाळ रडू लागल्यानंतर तेथेच बसलेल्या एका महिलेचे त्याकडे लक्ष गेले. बेवारस बाळाचे रडणे सहन न झाल्याने त्या महिलेने बाळाला घेऊन छातीला कवटाळले.

हा सगळा प्रकार तेथेच स्वच्छतेचे काम करणार्‍या सागर रोडगे, विलास गायकवाड, सूरज बिराजदार या कर्मचार्‍यांनी पाहिला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. रेल्वे पोलिस त्या बाळाला घेऊन जाऊ लागले तसे आणखी एक अनोळखी महिला त्यांचा पाठलाग करू लागली. पोलिसांनी व बाळाला घेतलेल्या महिलेने त्या अनोळखी महिलेला हटकले. त्यावर ती फक्त हिंदीतून काही नाही, एवढेच म्हणाली.

माणुसकी होती म्हणून..
प्रत्यक्षदर्शींचे सांगणे आणि त्या महिलेच्या हालचालीवरून ती मुलगी तिचीच असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शेवटी त्या चिमुकलीला व संशयित स्त्रीला पोलिस चौकीत नेण्यात आले. पहिल्यांदा ज्या महिलेने बाळाला उचलून घेतलेल्या महिलेच नाव विचारले असता, ‘नाव घेऊन काय करता साहेब? माणुसकी होती म्हणून मी तिला घेतले, आता या लेकराचे तेवढे बघा,’ असे म्हणत त्या निघून गेल्या.

फुटेजवरून छडा
ताब्यात घेतलेल्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी तर चिमुकलीला उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक अशोक सातपुते यांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव राजवंती मेहेर (रा. जबलपूर) असल्याचे सांगितले. अर्भक नक्की कोणी सोडले? हे सीसीटीव्ही फुटेज पाहून समजेल असे ते म्हणाले.