सोलापूर- सोलापूर विभागात रेल्वे पोलिसांची हद्द ही संपूर्ण सोलापूर विभाग आहे. मनमाडपासून ते वाडीपर्यंत तर इकडे मिरजपर्यंत सोलापूरची एकूण 951 किमीची हद्द आहे. सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडे दुधनी ते मुंढेवाडी पर्यंतची हद्द आहे. मुंढेवाडीपासून कुर्डुवाडी पोलिसांची हद्द आहे. या दोन वेगवेगळ्या यंत्रणांमुळे प्रवाशांना तक्रार दाखल करण्यासाठी फिरावे लागते.
सुरक्षेसाठी रेल्वे पोलिस; तर गुन्हे नोंदवण्यासाठी लोहमार्ग पोलिस
भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पोलिसांची नेमणूक केली. त्यांना ‘वॉच अँण्ड वॉर्ड’ चे काम दिले गेले. म्हणजे बघा आणि हुसकावून लावा असे त्यांचे काम होते.1947 मध्ये रेल्वे सिक्युरिटी फोर्सची स्थापना केली. त्यांना रेल्वेच्या संपत्तीची सुरक्षा करण्याची जबाबदारी दिली. त्यानंतर 1957 मध्ये आरपीयूपी म्हणजे रेल्वे प्रॉपर्टी अनलॉक पझेशन अँक्टची स्थापना केली. प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा कायदा 1997 मध्ये लागू झाला. आणि 1997 पासून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची व सामानाची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपविण्यात आली. या संदर्भातील गुन्हा दाखल करण्याचे व तपास करण्याचे अधिकार लोहमार्ग पोलिसांकडे आहेत.
रेल्वे पोलिसांना हे आहेत अधिकार
1 जुलै 2006 मध्ये रेल्वे पोलिसांमध्ये नवा कायदा लागू झाला. त्यानुसार ते 29 गुन्ह्यांवर कारवाई करू शकतात. याचे सर्व अधिकार रेल्वे पोलिसांना देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने रेल्वे रुळ ओलांडणे, विना तिकीट रेल्वेने प्रवास करणे, विनाकारण रेल्वे गाडीतील चेन ओढून गाडी थांबविणे, रेल्वेत सिगारेट ओढणे, रेल्वेत ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवास करणे, दारू पिऊन गोंधळ घालणे, रेल्वे कर्मचार्यांच्या कामात हस्तक्षेप करणे आदी प्रकारच्या गुन्ह्यांवर रोख लावण्याचे अधिकार रेल्वे पोलिसांना आहेत.
12 गाड्यांना आहे सुरक्षा
सोलापूर विभागातून रात्री धावणार्या गाड्यांना पोलिस संरक्षण मिळावे. रेल्वे पोलिसांनी सध्या 12 गाड्यांना सुरक्षा पुरवली आहे. पूर्वी दररोज 24 गाड्यांना सुरक्षा दिली होती. आता अनेक रेल्वे पोलिस निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी परराज्यांत गेलेले आहेत. त्यामुळे गाड्यांची सुरक्षा अध्र्यावरच येऊन थांबली आहे. अशीच परिस्थिती लोहमार्ग पोलिसांची आहे. लोहमार्ग पोलिस पूर्वी तीन गाड्यांना सुरक्षा पुरवत होते. आता केवळ दोन गाड्यांनाच सुरक्षा देण्यात येत आहे.
132 जागा आहेत रिक्त
सोलापूर रेल्वे विभागात रेल्वे पोलिसांची एकूण 452 जागा मंजूर आहेत. त्यापैकी 135 जागा रिक्तच आहेत. तसेच, रोज किमान 30 कर्मचारी रजेवर असतात. यात काही आजारी तर काही दूर गावी गेलेले असतात. 20 ते 25 निवडणुकीच्या अथवा अन्य बंदोबस्तासाठी दिले जातात. यातून केवळ 260 कर्मचारी रोज ड्युटीवर हजर असतात. यातूनच गाड्यांच्या सुरक्षेसाठी जवान पाठविले जातात. सोलापूर रेल्वे विभागाची हद्द 951 किमीची आहे. हे लक्षात घेता ही संख्या तोकडी पडते. सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडे एकूण 64 पदे मंजूर आहेत. त्या पैकी 58 पदे भरलेली आहेत. 6 पदे रिक्त आहेत. यात एक उपनिरीक्षक पद देखील रिक्त आहे.
प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक
एखादी अप्रिय घटना घडली तर रेल्वे कंट्रोलशी संपर्क साधावा. रेल्वे नियंत्रण कक्ष - 2312752 , रेल्वे पोलिस नियंत्रण कक्ष - 2317560, लोहमार्ग पोलिस ठाणे -2318767. येथे संपर्क साधावा.