आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीमधील सीसीटीव्ही यंत्रणा ‘असून अडचण नसून खोळंबा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हा परिषदेत चालणा-या कामकाजावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंह यांनी मुख्यालयात 64 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. पण, त्याची पाहणी करून प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा विसर पडला आहे. तसेच, सुरक्षिततेच्या कारणास्तव नवीन 14 ठिकाणी कॅमेरे बसवण्याचा दिलेला प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे.सुरक्षेच्या प्रश्नांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सहकारमहर्षींच्या पुतळ्याच्या विटंबनेची दुर्घटना घडली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जिल्हा परिषदेची ओळख. ग्रामीण भागातून छोट्या-मोठ्या कामांसाठी येणा-या नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत. कर्मचा-यांना बाहेरील व्यक्तींकडून अरेरावीचे प्रकार होऊ नयेत, प्रशासकीय कामांवर नियंत्रण राहावे, या उद्देशाने दहा लाख रुपयांची विशेष तरतूद करून तीन वर्षांपूर्वी कॅमेरे बसवण्यात आले. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंह हे बैठकीच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर पुन्हा मुख्यालयात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आवर्जून पाहत. त्यांच्या गैरहजेरीच्या काळात ज्या कार्यालयांमध्ये कर्मचारी गैरहजर होते? गैरप्रकार अथवा शिस्त बिघडल्याचे दिसल्यास तत्काळ खातेप्रमुख व अधीक्षकांना बोलावून कानउघाडणी करायचे. मात्र, कारभारी बदलला की कारभार बदलतो, या प्रमाणे सध्या सीसीटीव्ही कॅमे-यांची अवस्था झाली असून, मुख्य उद्देशच बाजूला पडला आहे.
झेडपीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दीड वर्षापूर्वी नव्याने आणखी 14 कॅमेरे बसवण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासह, वाहनतळ, रेकॉर्ड रूम, झेडपीच्या संपूर्ण आवारात ते बसवण्यात येणार होते. त्याबाबत वारंवार पाठपुरावा झाला. पण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनात सीसीटीव्ही नको, या तत्कालीन अधिका-यांच्या भूमिकेमुळे तो प्रस्ताव अद्याप पडून आहे. पदाधिका-यांनी त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. त्याचाच फटका झेडपीला भोगावा लागला. मुख्यालयातील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे निषेध मोर्चा काढण्यात आला. त्या दुर्घटनेमुळे झेडपीच्या सुरक्षा व्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगली गेली.

सहकारमहर्षींच्या पुतळ्यावर आता कॅमे-याची नजर
झेडपीत सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांच्या पुतळ्याच्या दिशेने प्रवेशद्वारातील कॅमे-याचे तोंड वळवण्यात आले. प्रस्तावित कॅमेरे वेळीच बसवले असते तर दुर्घटनेला आळा बसला असता किंवा वाईट प्रवृत्तीच्या माणसाचा शोध लागला असता. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे, कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांनी सांभाळणे गरजेचे आहे. नवीन कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यानंतर आम्ही तत्काळ पुढे पाठवला आहे. पण, प्रशासकीय पातळीवर तो रखडल्याची शक्यता आहे. त्याबाबत सर्व पदाधिका-यांशी चर्चा करून तो प्रश्न निकाली काढण्यात येईल.’’डॉ. निशिगंधा माळी, अध्यक्षा, जिल्हा परिषद