सोलापूर- शहरात शुभराय टॉवर्सच्या दुसर्या मजल्यावर केळकर हॉस्पिटलमध्ये आग लागली. इमारतीमध्ये 27 रुग्ण व सात कर्मचारी अडकले आहेत. दोन रुग्णांनी इमारतीवरून उडी घेतल्याने जखमी झाल्याचा निरोप जिल्हा नियंत्रण कक्ष व घटनास्थळावरून देण्यात आला. मात्र, निरोप मिळाल्यानंतर पाच मिनिटांत अग्निशमक दल, सात मिनिटांमध्ये पोलिस कर्मचारी, एमएसईबीचे कर्मचारी आठ मिनिटांत पोहोचले. अत्यावश्यक असणारी जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनेनंतर तब्बल 25 मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाली.
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशानुसार पावसाळ्यापूर्वी शासकीय विभागांची तत्परता तपासण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये अग्निशामक व पोलिस कर्मचारी वगळता इतर विभागांचे कर्मचारी नेहमीप्रमाणे उशिराच पोहोचल्याचे दिसून आले.
रंगीत तालीमचा उद्देश..
रंगीत तालीमच्या माध्यमातून कोणता विभाग किती तत्पर आहे, हे कळून येते. रुग्णवाहिका उशिरा पोहचल्याने संबंधित प्रमुखांकडून याची कारणे घेतली जातील. प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर सुविधा पुरवण्यास विलंब होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्यात येईल. याचा अहवाल आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर करणार आहोत. यानंतर संबंधित विभागाला घटनास्थळी उशिरा पोहचण्याचे कारण विचारण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनित तेलोरे यांनी सांगितले.
देखाव्यात रुग्णालय यंत्रणा ढिसाळ..
मंगळवारी शहरात आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये शासकीय विभागाचे पोलिस, महावितरण, अग्निशमक विभागाचे कर्मचारी 5 ते 10 मिनिटांच्या वेळेमध्ये पोहचले. मात्र, अत्यावश्यक सेवा समजल्या जाणार्या रुग्णवाहिकेने अध्र्या तासाने पोहोचत तत्परता दाखवली.