आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायव्हिंगपटू केतन शिंदे न्यायाच्या प्रतीक्षेत; विद्यापीठ प्रशासन अद्याप गप्पच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कझान (रशिया) येथे 6 ते 17 जुलै दरम्यान होणार्‍या जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेपासून सोलापूर विद्यापीठ क्रीडा विभागाच्या गलथान कारभारामुळे वंचित राहिलेला डायव्हिंगपटू केतन शिंदे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आज गुरुवारपर्यंत त्यास विद्यापीठाकडून कोणताही निरोप मिळाला नाही. केतन शिंदेला अजूनही संधी आहे, असा लेखी खुलासा करणारे सोलापूर विद्यापीठ प्रशासन आठवड्यानंतरही गप्पच आहे.

विद्यापीठाचे क्रीडा समन्वयक प्राध्यापक किरण चोकाककर यांची बाजू समजून घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. 21) केतन शिंदे याची बाजू समजावून घेणार असल्याचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी ‘दिव्य मराठी’ला गुरुवारी (ता.20) सांगितले होते. चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. मात्र, अद्यापर्यंत विद्यापीठ स्तरावर कार्यवाही झालेली नाही.

याबाबत केतन शिंदे याच्याशी संपर्क साधला असता तो म्हणाला, ‘चौकशीसाठी अद्यापपर्यंत मला विद्यापीठाकडून निरोप नाही. मी याबाबत लेखी निवेदन विद्यापीठास गुरुवारी (ता.20) दिले होते. तेव्हा मला चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे, असा निरोप कुलगुरूंच्या स्वीय साहाय्यकांकडून मिळाला. मला न्याय मिळेल या प्रतीक्षेत मी आहे.’