आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Junior Editor Award Win Ketaki Kulkarni Solapur

केतकीला ज्युनिअर एडिटरचा सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘दिव्य मराठी’च्या ज्युनिअर एडिटर या नामांकित स्पध्रेत ब गटातून विजेती ठरलेल्या सोलापूरच्या केतकी यशवंत कुलकर्णी हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. स्पर्धेतील यशाचे वृत्त धडकताच मंगळवारी सायंकाळी कर्णिकनगर मधील केतकी हिच्या निवासस्थानी स्नेही, आप्तेष्टांनी गारूड घातले होते. आनंद आणि उत्साहाने भारावलेल्या वातावरणात तिचा कौतुक सोहळा रंगला होता.

केतकीच्या यशाने आई, बाबा, आजोबा, बहीण-भाऊ यांना जणू आनंदाचे भरतेच आले होते. इवल्याशा वयात तिने राष्ट्रीय स्तरावरील यश मिळवल्याने वसाहतच जणू आनंदाने न्हाऊन निघाली होती. छत्रपती केने, एस. व्ही. थंबद, लेखक शरदकुमार एकबोटे, प्रभाकर हंजगे, गणेश कुलकर्णी, पी. एस. कुलकर्णी, विमल कुलकर्णी, एस. आर. पाटील, अशोक काजळे, व्यंकटेश कुलकर्णी, मनोरमा पत्की, अनिता कुलकर्णी आदी मान्यवरांनी तिच्या पाठीवर थाप देऊन तिचे मोठय़ा उत्साहात कौतुक केले.


यावेळी दिव्य मराठी टीमनेही तिचा सत्कार केला. निवासी संपादक संजीव पिंपरकर व युनिट हेड टिंकेश ग्यामलानी वितरण विभाग प्रमुख संजय जोगीपेठकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन केतकी हिचा सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र पाहून ती काही काळापुरती स्वत:लाच जणू विसरली होती. केतकीचे बाबा यशवंत कुलकर्णी हे अक्कलकोट येथे सहकार खात्यात नोकरी करतात तर आई शीतल कुलकर्णी या डॉक्टर आहेत.

कल्पनाशक्तीला दाद
भास्कर ग्रुपच्या वतीने ज्युनिअर एडिटर सेकंड अर्थात चिमुकले संपादक ही राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थीकेंद्रित स्पर्धा घेतली. अवतीभवतीच्या जगात घडणार्‍या घटनांचा मुलांच्या भावविश्वावर नेमका काय प्रभाव जाणवतो. विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि निर्मितीक्षमतांना वाव देण्याचा हा प्रयत्न होता. 12 पानी वृत्तपत्र तयार करण्याच्या या अनोख्या उपक्रमात देशातून सव्वातीन लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. केतकीने आपल्या अंकातून उंदीर व हत्तीची लग्नपत्रिका, संगीत क्षेत्रांच्या बातम्या, साबण, क्रीडा, घड्याळ अशा विविध विषयांवर लेखन केले होते. देशभरातील सव्वातीन लाख विद्यार्थ्यांमधून बी गटात विजेती ठरण्याचा मान केतकीला मिळाला.

कलेक्टर होण्याचे स्वप्न
या स्पध्रेत देशात विजेती बनलेल्या चिमुकल्याशा केतकीला मोठी झाल्यावर कलेक्टर व्हायचे आहे. तिच्या आई-बाबांनी तिला या स्पध्रेत यश मिळवण्यासाठी विविध पुस्तके आणून विषयांचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला भावी काळात कलेक्टर व्हायचे आहे अशी महत्त्वकांक्षा केतकीने व्यक्त केली. बातम्या करणे म्हणजे काय ? ते करण्यासाठी पत्रकारांना किती धावपळ करावी लागते. ती आणल्या नंतरही ती कुठे कोणत्या पानांवर लावायची असते. याचे ज्ञान मिळाले.