आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांप्रमाणे दिवाळीचा आनंद लुटताहेत वृद्धाश्रमातील आजी-आजोबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ना कुणी जन्मजन्माचे सोबती, ना कुणी रक्ताच्या नात्याचे. केवळ एकत्र राहून जुळलेली नाती. त्या जुळलेल्या नात्यांना जोडून त्या प्रेमावर जगणारे आधार केंद्रमधील आजी-आजोबाही यंदाची दिवाळी आनंदाने साजरी करत आहेत. फुलबाजी उडवण्यापासून ते फराळाच्या विविध पदार्थांची लज्जत घेण्यापर्यंत अगदी चिमुकल्या मुलांप्रमाणे उत्साहाने दिवाळीचा आनंद लुटत आहेत.

सुगंधी उटण्याची आंघोळ, औक्षण, नवीन कपड्यांचा आनंद अनुभव घेत आपल्या थरथरणार्‍या हातांना उत्सवाच्या उत्साहाचे चैतन्य देत ही माणसं प्रेमाच्या वर्षावात जगत आहेत. सोलापूरपासून दूर अंतरावर भोगाव येथे वसलेले आधार केंद्र हे वृद्ध निराधार आणि ज्यांची काळजी घेण्यासाठी कुणी नाही अशांसाठी खरोखरच आधार बनला आहे. आपल्या थरथरणार्‍या हातांना आधार केंद्रात आल्यावर काही भावनिक तर काहीवेळेस आरोग्याच्या दृष्टीने सदृढ करण्याचे प्रयत्न येथील आजी-आजोबा करत आहेत. त्यांच्या या प्रवासात उत्सव हे नवरंग भरत आहेत. त्यातही दिवाळी हा सण या आजी-आजोबांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आला आहे. दै. दिव्य मराठीने दिवाळीनिमित्त वृद्धश्रमातील आजी आजोबांचे मनोगत जाणून घेतले.

असा सजलाय सण
फराळ तयार करण्यापासून ते त्यांची मिळून मजा लुटण्यापर्यंत सगळेच एकत्र येतात. पहिली आंघोळ आणि नरक चतुर्थदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे सारे दिन त्या त्या रूढीनुसार पार पाडले जातात. त्यात सगळेजण आपापल्या परीने रंग भरण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांना एकत्र आणून त्यांना मायेने बांधण्याचे काम करतात डॉ. नंदा शिवगुंडे.

आमचे विश्व न्यारे
मी गेली अनेक वर्षे आधारमध्ये राहते. मला आमच्या आधार घरात ही दिवाळी मोठय़ा प्रमाणावर होते. पहिल्या दिवशी आंघोळ करण्याने सुरुवात होते. दुसर्‍या दिवशी विविध प्रकारचे फराळ, दिवसभर गप्पा, आपल्या गुजगोष्टी अन् रात्री रंगीबेरंगी फटाके याने आमचे हे पाच दिवस खूप आनंदात जातात. लक्ष्मीबाई जोशी, आधार रहिवासी आजी

घर आठवते..
मी खूप वर्षे झाली आधारमध्ये आहे. ना कुणी जवळचे ना कुणी लांबचे. मी एकटीच. ‘आधार’च माझा सगळा आधार आहे. आई-बाबांची लाडकी असतानाचे माझे घर आठवते आणि मन गलबलते. ते भरलेले घर. सण-उत्सव म्हटले की, सर्वजण मिळून साजरे करण्यात आनंद असतो. तसाच आम्हीही साजरा करतो. आमच्या या घरात प्रत्येकाला दिवाळीचा आनंद मिळतो. नलिनी मराठे, आधार रहिवासी आजी

घर म्हणजे नात्यांचा बंधच
ज्या घरात नात्यांचा बंध नाही ते घर नसते. जिथे प्रेम जिव्हाळा आहे, जिथे प्रेमाचे टॉनिक आहे तेच खरे घर आहे. तोच आमचा आधार आहे. लहानपणी जसा फुलबाजीसाठी आतुर असायचो तसाच आजही आतुर असतो. मला फराळ, फटाक्यांची आतषबाजी खूप आवडते. ती प्रेमाच्या माणसांसह लुटतो. देविदास कोकणे, आधार रहिवासी आजोबा

ब्रिजधाम वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते ही दिवाळी खूप बदललीय. पूर्वीचे एकत्रित कुटुंब पद्धती, पाहुणचार, ये जा, आनंदी क्षण आता अनुभवता येत नाहीत.

कृष्णा महागावकर : मी मूळचा गुलबर्गा येथील. गेली 15 वष्रे ब्रिजधाम वृद्धाश्रम हेच माझे घर आहे. भाऊ-वहिनी आहेत. त्यांच्याकडे दिवाळीत कधीतरी जातो. मात्र, तीन दिवसांतच परत फिरतो.

मल्लिकार्जुन उजळंबे - आठवीपर्यंतचे शिक्षण झालेले. कामधंदा नसल्याने वडिलांनी माझे लग्नच करून दिले नाही. एकटाच राहिलो या अफाट जगात. पण भाऊ आहे, तो कधी कधी येतो. मीही जातो.

शरद लिमये - मुंबईतील टाटा कंपनीत आयुष्यभर नोकरी केली. लग्न राहूनच गेले. सोलापुरात सन्मानाने जगणे हेच ध्येय ठेवले.

मोहन सट्टीकर - मूळचा सांगलीचा. आता ब्रीजधाम हेच घर झालेय. डायबेटिसवर उपचारही घेतो. मुलगा गुलबर्गा येथे केंद्रीय कंपनीत उच्चाधिकारी आहे. तो येणार आहे, दिवाळीत.

ब्रिजमोहन फोफलिया (संस्थापक) : आयुष्यात खूप भोगलेली माणसे येथे पाहतोय. 22 जण आहेत सध्या. दानशूरांमुळे संस्था मोठी झाली. ज्येष्ठांनी आपली प्रापर्टी आपल्याच नावावर शेवटपर्यंत ठेवावी.