आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धूम्रपान नको’च्या सूचना सचित्र फलकांनी करणार, आरोग्य विभागांमध्ये होणार प्रभावी अंमल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘धूम्रपान करू नका’, ‘थुंकू नका’ अशा पाट्यांकडे गांभीर्याने कुणी पाहात नाही; परंतु त्याच्या परिणामांची चित्रे लावल्यास प्रभाव जाणवतो. सिगारेट, गुटखा, विड्यांच्या वेष्टणावरील या सचित्र प्रयोगाने काहीअंशी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कमी झाल्याचे आले. तोच प्रयोग आता ‘मनाई’ करणार्‍या पाट्यांशेजारी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलासाठी केंद्र शासनाने मार्गदश्रक सूचना केल्या. आरोग्य केंद्रांमध्ये त्याचा अंमल होईल.

केंद्राने 2003 मध्ये धूम्रपानविरोधी कायदा आणला. त्यानुसार तंबाखूजन्य पदार्थांवरील वेष्टणांवर ‘आरोग्यास अपायकारक’च्या सूचना सचित्र सुरू झाल्या. चित्रपट सुरू होण्याअगोदर आणि सुरू झाल्यानंतर धूम्रपानाच्या प्रत्येक दृश्यांच्या वेळी हा इशारा देण्याचे सक्तीचे झाले. त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे झाल्याचा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केला. त्यानुसार मनाई पाट्यांवर परिणामांची चित्रे डकवण्याचे आदेश दिले. शासनाच्या आदेश आले, आता काटेकोटर अमंलबजावणीकडे लक्ष आहे.

पोलिस करणार कारवाई
सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे आणि पान-तंबाखू खाऊन थुंकणार्‍यांवर कारवाई करणार कोण, हा प्रश्न सामान्यांना अद्याप कळलेला नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग संबंधित कार्यालय प्रमुखांकडे बोट दाखवते. कार्यालयप्रमुख पोलिसांकडे अंगुलीनिर्देश करतात. पोलिसांनी तर आतापर्यंत अशी कारवाईच केलेली नाही. पोलिसाच्या म्हणण्यानुसार मनाई असताना केलेल्या कृत्याची नोंद हवीय. शासन आदेशात ‘मुंबई पोलिस अधिनियम कलम 116’ नुसार अशी कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांवरच आहे.
काही निरीक्षणे
1 सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने क्षयरोग, स्वाइन फ्ल्यू, न्यूमोनिया या आजारांचा फैलाव होतो
2 धूम्रपानामुळे कर्करोग, श्वसनाचे आजार, पुनरूत्पादन संस्थेचे आजार, पचनसंस्थेचे आजार
3 क्षयरोगाने देशातील 3 लाख लोक मृत्युमुखी पडले, त्यात 6692 एवढे महाराष्ट्रातील आहेत
4 राज्यात सुमारे 31.4 % लोकांचा मृत्यू तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो

आणखी कडक करावे
मनाई करणार्‍या पाट्या आणि सचित्र फलकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कमी हाईल, हा निष्कर्षच मुळात चुकीचा वाटतो. तरुण पिढी अशा पाट्यांकडे ढुंकूनही पाहात नाही. इशारे वाचण्यास वेळ देत नाही. अशा स्थितीत उत्पादनावर बंदी आणणे योग्य वाटते. पण महसूलच्या दृष्टीने शासनाला ते कधीच शक्य होणार नाही. डॉ. विद्याधर सूर्यवंशी, श्वसनविकारांचे तज्ज्ञ