आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे कराल तरच टिकाल, अन्यथा घरी बसावे लागेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तलाठी मंडलाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचा कणा आहेत. परंतु आज तुम्ही कणा उरला आहात का? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पुढील काळात ठरवून दिलेल्या वेळेतच काम करावे लागणार आहे. जे काम करणार नाहीत, ते घरी बसतील. त्यावेळी तुमच्या एका कुटुंबापेक्षा तुमच्यावर जबाबदारी असलेल्या ५०० कुटुंबांचा विचार करीन, अशी स्पष्ट समज जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.

‘प्रशासनातील नवीन बदल कामकाज’ याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर बुधवारी शिवछत्रपती रंगभवन येथे झाले. श्री. मुंढे यांनी तलाठी आणि मंडलाधिका-यांच्या कामाच्या सद्य:स्थितीविषयी खंत व्यक्त केली. श्री. मुंढे यांनी अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव करून दिली. ते बोलत असताना सभागृहात ‘पीन ड्रॉप सायलेन्स’ होता.

श्री. मुंढे म्हणाले , “२० वर्षांपूर्वी तलाठ्याची परवानगी असल्याशिवाय गावात पानही हलत नव्हते. ही स्थिती आज आहे का? अधिकार सोडून इतर धंदेच वाढले. बिनकामाची पाटीलकी वाढली. भावांमध्ये भांडणे लावून त्यावर पोळी भाजून घेतली. हा बदल का झाला? कोणी केला? त्याला जबाबदार कोण? हे घडले कारण, तलाठी, मंडलाधिकारी यांनी अधिकार वापरणे बंद केले. झापडे लावून काम करण्याची सवय पडली. गावातील सरकारी जमीन किती? पाण्याचे स्रोत किती? सिंचन क्षेत्र किती? हे ठोसपणे सांगणारा एकही तलाठी वा मंडलाधिकारी आज येथे नाही.
या वेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, शहाजी पवार, श्रावण क्षीरसागर, संजय तेली आदी उपस्थित होते.
असुरी नको निर्भेळ आनंद घ्या
पगारवाढ झाली नाही तर एकाच दिवसात संपूर्ण जिल्हा बंद करू शकतो, असा इशारा देणारी संघटना, आम्ही १०० दिवसांत जिल्ह्याचा विकास करू, असा इशारा कधी देत नाही. आम्ही गावात भावा-भावात भांडणे लावली आणि आनंद लुटला. अशा असुरी आनंदापेक्षा लोकांची कामे करून निर्भेळ आनंद घ्या.'' तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी

ही कामे करण्‍याची मदत
शेती, जमिनीविषयी न्यायालयीन प्रकरणे वगळता अन्य प्रकरणांची माहिती घ्यावी. येत्या ३० एप्रिलपर्यंत सर्व निकाली काढा.
शेतरस्ते, पाणंदरस्ते शिवरस्ते याचे लोकसहभागातून मातीकाम करा. लोकांमध्ये जावा. ही कामे येत्या ३१ मेपर्यंत करा.
तहसीलदार वा प्रांताधिकारी गायरान, शर्तभंग, महारवतन सार्वजनिक मालमत्ता याचे आकडे ३१ मेपर्यंत यांना द्या.
गावाचे पालकत्व तलाठ्याकडे असते. गावभेटीत धान्य मिळत नसल्याची तक्रार आल्यास तेथेच तलाठ्यांवर कारवाई.
सिंचन क्षेत्राचे प्रत्यक्ष आकडे जमा करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी आदेश दिले आहेत. ३१ मेपर्यंत आकडेवारी उपलब्ध करावी.