उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ अर्थात मॅग्मो संघटनेने मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सलाइनवर सुरू आहे. जिल्ह्यातील 150 डॉक्टर संपावर गेल्यामुळे उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य कें द्रात रुग्णांचे हाल झाले. जिल्हा रुग्णालयात प्रथम श्रेणीच्या 5 वैद्यकीय अधिका-यांनी यंत्रणा सुरू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
2009-10 मध्ये सेवा समायोजन झालेल्या वैद्यकीय अधिका-यांना पूर्वलक्ष लाभ मिळावा, अस्थायी डॉक्टरांचे समायोजन करावे, वैद्यकीय अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 62 करावे, बीएएमएस वैद्यकीय अधिका-यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, वरिष्ठ आरोग्य अधिका-यांप्रमाणे 3 व 6 आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळावा आदी मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, शासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे राज्यातील वैद्यकीय अधिका-यांनी 2 जुलैपासून असहकार कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मागण्यांबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्यामुळे संघटनेने मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.
सकाळी जिल्ह्यातील जवळपास 150 डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयाच्या मैदानात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने सुरू केली. या संपामध्ये डॉ. सचिन देशमुख, डॉ. अभिजीत बागल, डॉ. दिग्गज दापके, डॉ. सुजीतकुमार रणदिवे, डॉ. संजय सोनटक्के, डॉ. सचिन रामढवे आदी सहभागी झाले होते.
इतर डॉक्टरांची मदत
आरोग्य यंत्रणा कोलमडणार असल्याने प्रशासनाने शालेय आरोग्य तपासणी मोहिमेवर असलेल्या 61 आयुर्वेदिक डॉक्टरांना जिल्हा तसेच उपजिल्हा रुग्णालयात मदतीला घेतले.
शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
जिल्हा रुग्णालयात दररोज बाह्यरुग्ण विभागात सुमारे 1 हजार रुग्णांची तपासणी केली जाते. आंतररुग्ण विभागात दाखल होण-या रुग्णांची संख्या 100 वर आहे. मंगळवारी नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या.
आमदारांची भेट; वाहनचालकांचा पाठिंबा
या आंदोलनाला पाठिंबा देत रुग्णवाहिकेच्या चालकांनीही सहभाग नोंदविला. शासनाकडे राजीनामा पाठवून देऊन कोणत्याही उपचार सेवेत सहभागी न होण्याचे धोरण डॉक्टरांनी अवलंबले आहे. या पत्रकावर नागनाथ निंबाळकर, भरत जाधव, राजेश गायकवाड, एस. वाय. कुलकर्णी, अशोक म्हात्रे आदींच्या सह्या आहेत. सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना आमदार ओमप्रक ाश राजेनिंबाळकर यांनी भेट दिली. त्यानंतर माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनीही आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेतली.