आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू-मुस्लिम ऐक्यावर बनला सोलापुरात लघुपट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापुरातील हौशी कलावंतांनी एकत्र येऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा लघुपट तयार केला आहे. जातीय दंगलींमुळे सामान्य माणसाची कशी होरपळ होते, याचे चित्रण यात आहे. पडघम या नावाने तयार केलेल्या या लघुपटाचे छायांकन, दिग्दर्शन सोलापूरच्याच कलाकारांनी केले आहे. चित्रिकरणासाठी लागणारे सर्व साहित्य आणि तांत्रिक सुविधाही स्थानिकांनीच सांभाळल्या आहेत.

या लघुपटात मुख्य पात्रे 14 आणि अन्य छोटी मोठी पात्रे 40 आहेत. रंगभूमीवर काम करणार्‍या कलावंतांनी बनवलेला सोलापुरातला हा पहिलाच लघुपट आहे. कथा, पटकथा, संवाद डॉ. संजीव शेंडे यांनी लिहिले आहे. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी होणार्‍या लघुपटाच्या स्पर्धेत हा लघुपट पाठवला जाईल, अशी माहिती श्री. शेंडे यांनी दिली.

अशी आहे कथा
शिरवळ नावाच्या गावात हिंदू मुस्लिमांची संख्या सारखीच असते. मंदिर आणि मशिद लगत असतात. तेथील रस्त्यावरून वाद होतो. दंगल भडकते. गावाची अपकीर्ती होते. पुजारी आणि मौलवीच्या हेकेखोरपणामुळे दुही वाढत जाते. पुजार्‍याच्या पत्नीच्या बाळंतपणाच्या वेळी तिचा जीव धोक्यात येतो. गावात डॉक्टर्स यायला तयार होत नाहीत तेव्हा मुस्लिम समाजातील ‘खाला’ मदतीला धावते. हसरे बाळ जन्मते. मग गावातील लोकांचे मतपरिवर्तन होते.

हे आहेत कलाकार
लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण सोलापुरातच झाले आहे. विकास सुरवसे, अविनाश तमनूर, इलियास सिद्दीकी, डॉ. संजीव शेंडे, तेर्जशी गोसावी, अनिता गवळी, श्रीकांत हिरेमठ या कलावंतांनी काम केले आहे.

>सोलापूरच्या मातीत आम्ही सर्व कलावंतांनी मिळून काम केले. या कामाचा अनुभव आनंददायी होता. आम्हा 40 कलावंतांना एकत्र घेऊन दिग्दर्शक रत्नाकर जाधव यांनी हा लघुपट बनवला आहे.
-विकास सुरवसे, कलावंत

>विविध लघुपट महोत्सवाच्या स्पर्धा झाल्यानंतर सोलापूरकरांसाठी खास शो आयोजित करणार आहे. स्वातंत्र्य दिनी आयोजनाचा प्रयत्न राहील
-रत्नाकर जाधव, दिग्दर्शक

शोध आशेचा
सुमारे 40 स्थानिक कलाकारांचा सहभाग, सोलापुरातील पहिलाच लघुपट