आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक, कागदी राष्ट्रध्वज वापरू नका, सरकारी आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये राष्ट्रध्वजांचा उचित सन्मान झालाच पाहिजे. त्यासाठी भारतीय ध्वजसंहिता नियमांचे पालन करण्यात यावे, अशा सूचना राज्याच्या गृह खात्याने दिल्या आहेत. अपवादात्मक ठिकाणी (सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे) कागदी राष्ट्रध्वज वापरता येतील. परंतु प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरता येणार नाही, असे गृह खात्याने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

खराब झालेले तसेच माती लागलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्रमांक १०३-२०११) दाखल झाली. त्यावर निर्णय देताना २९ सप्टेंबर २०१४ रोजी न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना केल्या. त्याचे पालन करण्याची जबाबदारी गृह खात्याकडे सोपवण्यात आली. त्यानुसार गृह खात्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या सूचना पाठवल्या आहेत.

असे करावे नष्ट
खराबझालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून, शिवून बंद करावेत. ते सूर्यास्तानंतर अथवा सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावेत. हे करताना उपस्थित सर्वांनी उभे राहावे. ते पूर्ण जळून नष्ट होईपर्यंत कोणीही जागा सोडू नये, असे संकेत दिलेले आहेत.
कार्यक्रमस्थळी पडलेले, खराब झालेले, माती लागलेले ध्वज गोळा करून जिल्हा तालुकास्तरावरील यंत्रणेकडे सुपूर्त करावेत. यंत्रणेने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त करावेत.
कागदी आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जनजागृती करावी. त्यासाठी जिल्हा तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात. त्यात लोकसहभाग घ्यावा.
ध्वजसंहितेच्या कलम २.२ मधील प्रयोजनासाठी कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. परंतु प्लास्टिक ध्वजांच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. दोन्हींचा वापर रोखण्याचे प्रयत्न व्हावेत.
ध्वजसंहितेचे पालन सर्वांनी करावे
- राष्ट्रध्वजाच्यासन्मानासाठी ध्वजसंहिता नियमांचे पालन झालेच पाहिजे. त्यासाठी शऔक्षणिक संस्था, सेवाभावी संघटनांनी खबरदारी घ्यावी. कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत.” तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी