आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौंड-सोलापूर विद्युतीकरण कामास लवकरच सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे विभागातील मनमाड ते वाडी दरम्यानच्या दुहेरीकरणाचे व विद्युतीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मनमाड ते दौंड दरम्यानचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत हे काम संपून शिर्डी ते दौंड व दौंड ते सोलापूर दरम्यानच्या कामास प्रारंभ होणार आहे. सोलापूरपर्यंत हे काम आल्यानंतर सोलापूर, वाडी व गुंटकल असा कामाचा टप्पा असणार आहे. विद्युतीकरणामुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरून ये-जा करणार्‍या गाड्या अधिक वेगवान होतील. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

सोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने आशियाई बँकेकडून 1600 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या अंतर्गत मनमाडपासून सुरू झालेले विद्युतीकरणाचे काम आता शिर्डीपर्यंत पोहोचले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी 2014 पर्यंत होणार आहे. तसेच दौंड ते गुलबर्गा या 290 किमी पर्यंतच्या विद्युतीकरणाचे कामही येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. दौंड ते गुलबग्र्याच्या विद्युतीकरणाचे काम सोलापूर रेल्वे स्थानकावरून जाणार आहे. हेच काम पुढे वाडी व गुंटकलपर्यंत होणार आहे.

हे काम वेगवेगळ्या टप्प्यांत पूर्ण होणार आहे. तर वाडी ते गुलबर्गा या 40 किमीच्या विद्युतीकरणाच्या कामाचीही नुकतीच निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे त्याही कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक इंजिन अधिक ताकदवान
डिझेल इंजिनची ताकद 4000 हॉर्स पॉवर आहे, तर इलेक्ट्रिक इंजिनची ताकद 5000 हॉर्स पॉवर आहे. तुलनेने 1 हजार पॉवरचा फरक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक इंजिन हे अधिक ताकदवान ठरते. तसेच इलेक्ट्रिक इंजिनमुळे डिझेल इंधनाची मोठय़ा प्रमाणात बचत होईल.

विद्युतीकरण करण्याचे हे आहेत फायदे
सध्या सोलापूर स्थानकावरून होणारी रेल्वे वाहतूक ही डिझेल इंजिनद्वारे होते. विद्युतीकरणामुळे इलेक्ट्रिक इंजिन रेल्वेस जोडली जातील. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढेल. प्रवासाचा वेळ वाचेल. डिझेल इंजिनमुळे होणारे हवेचे प्रदूषण टाळता येईल. तसेच गाड्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे.