आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DPC Election Issue At Solapur Municipal Corporation

डीपीसी निवडणूक: महापालिकेत चुरस; जिल्हा परिषदेत गटातटांचा वाद.!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवडून जाण्यासाठी उमेदवारीवरून जिल्हा परिषदेतील गटातटांच्या वादाचे राजकारण रंगणार आहे. महापालिका आणि नगरपालिकांमधूनही उमेदवारी मिळण्यासाठी चुरस आहे. जिल्हा परिषदेत चार गट तर महापालिका व नगरपालिकांमध्येही उमेदवारीवरून धुसफूस सुरूच आहे. समितीवर सदस्य म्हणून निवडून जाण्यासाठी उमेदवारीचा हेका धरणार्‍यांमध्ये जिल्हा विकास आणि नियोजन समितीच्या कामकाजाचा अभ्यास किती जणांना, याबाबत मात्र संदिग्धताच आहे. जिल्हा नियोजन समितीच्या 40 जागांसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी 89 जणांनी अर्ज भरले असून, त्या अर्जांची छाननी 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये मोहिते-पाटील, शिंदे बंधू, भालके-महाडिक-काळे, काँग्रेस असे चार गट आहेत. राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीचा लाभ घेण्याची खेळी कॉंग्रेसकडून केली जाऊ शकते. शेकापचे तीन सदस्य कोणाकडे राहतील हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मोहिते-पाटील यांच्या हातात जिल्ह्याचे राजकारण असताना अशी स्थिती कधीच नव्हती. पण गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अनेकदा नुकसान व फटक्यांना सामोरे जावे लागले आहे. पालकमंत्र्यांचे कोणीच ऐकत नसल्याने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार असून याचा लाभ घेण्यासाठी विरोधक सज्ज आहेत. महापालिकेतही कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जसे गटतट तशीच स्थिती भाजपमध्येही आहे. एकूणच जिल्हा नियोजन समिती निवडणुकीतील उमेदवारीवरून पक्षांतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर येणार आहे. झेडपीच्या एकूण 27 जागांसाठी 49 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये उपाध्यक्ष सुभाष गुळवे, समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, महिला बालकल्याण सभापती जयमाला गायकवाड या पदाधिकार्‍यांसह सुरेश हसापुरे, विरोधी पक्षनेते संजय पाटील, पक्षनेते मकरंद निंबाळकर, सीमा पाटील यांचा समावेश आहे. पाच फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. महापालिकेच्या नऊ जागांसाठी 14 अर्ज आले असून, सुरेश पाटील, महापौर अलका राठोड, शोभा बनशेट्टी यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले. छाननीनंतर अन्य उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सदस्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. नगरपालिका गटातील चार जागांसाठी 26 जणांनी अर्ज केले आहेत. अनुसूचित जातीसाठी मंगळवेढा नगरपालिकेच्या सदस्य कलावती खंदारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

नगरपालिका गटातून चार सदस्य निवडून येणार आहेत. त्यापैकी कलावती खंदारे यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. अन्य तीन जागांसाठी 25 जण रिंगणात आहेत.

अशा आहेत जागा (कंसात महिलांसाठीच्या जागा)
जिल्हा परिषद गट - 27 (13)
नगरपालिका - 4 (2)
महापालिका - 9 (5)
प्रक्रिया अशी
छाननी - 24 जानेवारी
अर्ज मागे घेणे - 5 फेब्रुवारी
मतदान - 14 फेब्रुवारी

महापालिका गट
महापालिकेतून नऊ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यात पाच महिला आणि चार पुरुष आहेत. त्यात सर्वसाधारण पुरुष दोन, अनुसूचित जाती एक, ओबीसी एक आणि महिलांसाठी सर्वसाधारण तीन आणि ओबीसी महिला दोन अशा जागा आहेत. सर्वसाधारण पुरुषमधून भाजपचे सुरेश पाटील आणि काँग्रेसचे महेश कोठे, ओबीसीतून आरिफ शेख, ओबीसी महिलामधून शिवसेनेच्या रार्जशी कणके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर अलका राठोड यांनी खुला आणि ओबीसी अशा दोन गटांतून अर्ज दाखल केल्याने एका ठिकाणी त्या माघार घेतील. राष्ट्रवादीच्या सुनिता रोटे आणि खैरून्निसा शेख यांनी एकाच गटातून अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीचा एकच सदस्य निवडून येण्याची शक्यता त्यामुळे दोघांपैकी एकजण माघार घेईल. अनुसूचित जातीमधून कॉंग्रेसचे देवेंद्र भंडारे आणि नरसूबाई गदवालकर यांनी अर्ज दाखल केले.