आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वसनीय, अविस्मरणीय, अवर्णणीय!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रविवारची प्रसन्न पहाट! आमचा जंगली ग्रुप (राहुल वैद्य, मुकुंद शेटे, परमेश्वर पाटील, विवेक भंडारी, ऋतुराज कुंभार व मी नेहमीच्या भटकंतीसाठी बाहेर पडलो होता. हिप्परगा तलावाकाठची डिसेंबर-जानेवारीची थंडी, पण सोलापुरात ती गुलाबीच! आपापल्या कॅमेराच्या बॅग्ज पाठीशी मारून तलावाच्या दिशेने निघालो. सहाजण असूनही कोणीही एक शब्द बोलत नव्हतं. कारण बोललो तर त्या आवाजाने सावज पळायची भीती!

बदकांच्या आवाजाची चाहूल लागली, सर्वांच्या नजरा त्या दिशेने वळल्या. गवतात दबा धरून बसलो. तेवढय़ात तीन मोठे पक्षी पाणथळ जागेतून उडाले. राहुल दबक्या आवाजात म्हणाला, अरे, ते क्रेन्स आहेत, क्रेन्स. कॅमेरे सरसावले, पटापट त्या पक्ष्यांना टिपत गेलो. आमच्या डोक्यावरून उडत ते नजरेआड झाले तरी त्यांचा क्व्ॉक, क्व्ॉक हा तीव्र आवाज येत होता. आम्ही शांतपणे कानोसा घेत राहिलो. थोड्याच वेळात ते ज्या दिशेने आले होते तिकडून तोच तीव्र आवाज आला. आणखी नऊ क्रेन्स. आम्ही हरखून गेलो.

क्रेन्स आणि सोलापुरात. वा! छान फोटो मिळाले, असा विचार करीत बसलो. इतक्यात एक अद्भुत गोष्ट घडली. तीन नव्हे, नऊ नव्हे तर बेचाळीस हो बेचाळीस क्रेन्स आमच्या दिशेने येताना दिसले. आम्ही मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिला. तो क्षण अविस्मरणीय होता. त्यांचा काळा पांढरा रंग, डौलदार माना, तीरासारखे मोहक उडणे, पाहवे का फोटो काढावेत हेच कळत नव्हतं. शांत निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर काळ्या पांढर्‍या व करड्या रंगांची रांगोळी रेखाटली जातेय असे वाटत होते.

प्रत्येक एका पक्ष्याला कॅमेरात टिपणं केवळ अवघड होतं आणि सर्व पक्षी एकत्रित एका फ्रेममध्ये बसवणं त्याहून अवघड होतं. तरीही प्रयत्न केला, आधाशासारखे फटाफट टिपत गेलो. तब्बल पाऊण तास हा सोहळा चालला होता. इतक्या जवळून, इतक्या मोठय़ा संख्येने हे पक्षी पाहणं खरच नशिबानेच लाभत असतं, दूरवरून हे करकोचे व बगळ्यांसारखे, दिसत असले तरी ते उडतात तेव्हा त्यांच्या माना सरळ आणि लांब शरीरास समांतर असतात, तर बगळे व करकोचे हे इंग्रजी उलट्या एस आकारात माना दुमडून उडतात. आंतरखंडीय स्थलांतर करण्यासाठी क्रोंच प्रसिद्ध आहेत. बर्‍याचदा ते फक्त जोडीदारासोबत दिसत असले तरी थव्याने राहणे पसंत करतात.

असे म्हणतात की, संपूर्ण आयुष्यभर क्रोंच हा एकाच जोडीदारासोबत राहतो. यावरून त्याची सुंदर प्रणयक्रीडा व नृत्य पाहता महर्षी वाल्मीकींना काव्य स्फूरलं ही आख्यायिका वाचताना अजिबात नवल वाटू नये! तर असे हे भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचे प्रतीक मानले गेलेले सुंदर क्रोंच !!
(लेखक हे पक्षी प्रेमी आहेत.)