आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Narendra Dabholkar Murdercase Issue Police And CBI

डॉ.नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरण: पोलिस तपास योग्य; सीबीआयची घाई नको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक व्यापक स्तरावरून आणि प्रामाणिकपणे तपास सुरू आहे. ते खुन्यापर्यंत नक्कीच पोहोचतील, असा आमचा विश्वास आहे. तपास योग्य दिशेने सुरू असताना आता पुन्हा तो सीबीआयकडे सोपवणे अयोग्य ठरणार आहे, असे डॉ. दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी सांगत सीबीआय तपासाच्या मागणीला पूर्णविराम दिला.

मुक्ता दाभोलकर या मंगळवारी सोलापुरात आल्या होत्या. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात सकाळी दाभोलकर यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपासासाठी राज्य सरकारने पुणे क्राईम ब्रॅन्च, मुंबई क्राईम ब्रॅन्च, शिवाय दहशतवाद विरोधी पथकांची नेमणूक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी जवळपास 1 कोटी लोकांचे मोबाईल कॉल व लोकेशन तपासले आहे. तपास अगदी योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सापडतील, असा आमचा विश्वास आहे, अशावेळी पोलिस तपासावर अविश्वास दाखवत सीबीआयकडे तपास वर्ग करणे योग्य ठरणार नाही, असे त्या म्हणाल्या. यावेळी अविनाश पाटील, कॉ. रवींद्र मोकाशी, अँड. गोविंद पाटील, निशा भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांना कायद्याची माहिती हवी
जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांना या कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच तो प्रभावीपणे राबवण्यासाठी डीवायएसपी स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात 3 ते 4 व्हिजिलेन्स ऑफिसर नेमावेत, अशी मागणी अंनिसने गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. आता महाराष्ट्र सरकारकडून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे, असेही मुक्ता दाभोलकर म्हणाल्या.

कुतुहुलाने भरले डोळे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. दाभोलकरांच्या कन्या मुक्ता यांनी जेव्हा बोलण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितेने तर सुरेश भटांच्या कवितेने शेवट केला. त्या दरम्यान त्यांनी आपल्या कार्याची पारदर्शकता स्पष्ट करत महाराष्ट्राच्या तरुणाईने आता काय करावे हे परखड मत मांडले. त्यावेळी पुन्हा एक दा अंनिसचे विवेकी विचार प्रवाह वाहू लागल्याचा आनंद कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाहावयास मिळाला.

तरुणांनी कृतिशील बनावे : मुक्ता दाभोलकर
समाजव्यवस्था बदलायची असेल तर वैयक्तिक विकासासह आपल्या आजूबाजूला काय चालले आहे ते चिकित्सकपणे पाहून काम करण्यास सुरुवात केली तर समाजव्यवस्था घडविणे शक्य आहे. तरुणाई हे काम जोमाने करू शकते. त्यासाठी तरुणांनी कृतिशील बनावे, असे मत अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या व कै. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.

अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मंगळवारी आयोजित द. भै. फ. दयानंद महाविद्यालय येथे विवेकाचा युवा जागर संवाद या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना व एनएनसीच्या छात्रांशी मुक्तपणे संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर अंनिसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रा. अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोकाशी, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. र्शीनिवास वडकबाळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पाटील, सुधाकर काशीद, शहराध्यक्ष निशा भोसले, धर्मा चौरे, आर. एन. मुळीक आदी उपस्थित होते.

मुक्ता दाभोलकर पुढे म्हणाल्या, ‘‘आजच्या समाजापुढे खूप आव्हाने आहेत. जेव्हा क्र ांती होते तेव्हा समता, स्वातंत्र्य, बंधुता दुमदुमत असते. अशावेळी तरुण असणे म्हणजे तो स्वर्ग सुख देणारा क्षण असतो. त्यामुळे तरुणाईने विवेक विचार अंगीकारून त्यास जोपासले पाहिजे.’’ प्रा. पाटील यांनी युवा चेतना देशाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होती.