आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DR. Raosaheb Kasabe, Latest News In Divya Marathi

एकटेपणातूनच माणूस बनला हिंसक - डॉ. कसबे यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जागतिकीकरणाचा सर्वांना लाभ होईल. दारिद्रय़ नाहीसे होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु मानवी स्वभावाने त्यात एक मोठा पेच निर्माण करून ठेवला. त्याने संपत्ती जमवली; पण ती कोणी तरी नेईल म्हणून भीती वाटू लागली. त्यातून तो हिंसक बनला. जगात अशा भेदरलेल्या माणसांकडूनच सध्या हिंसा सुरू आहे. निर्माण झालेला पेच सोडवला नाही तर त्याला पुढील पिढय़ांनाही सामोरे जावे लागेल, असा इशारा आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी सोमवारी येथे दिला.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कारांचे वितरण सायंकाळी झाले. साहित्य पुरस्कार डॉ. कसबे यांना तर समाजसेवा पुरस्कार डॉ. प्रवीण पाटकर (मुंबई) यांना प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा सोहळा झाला. 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि र्शीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. ख्यातनाम वातट्रिकाकार रामदास फुटाणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड, प्रा. विलास बेत, बाबूराव मैंदर्गीकर, सभागृह नेते महेश कोठे मंचावर होते.
डॉ. कसबे म्हणाले, ‘‘शूर माणसे अहिंसकच असतात. ज्याला मृत्यूची भीती असते, ज्याला एकटेपणा खात असतो, तोच हिंसक बनतो. एकविसावे शतक उजाडताच अशी स्थिती निर्माण झाली. 90 च्या कालखंडात मूलतत्त्ववादाचे जे भीषण रूप पाहायला मिळाले, ते त्याचेच द्योतक होते. तेव्हापासूनच दहशतवाद पुढे आला आणि माणूस असुरक्षित झाला.’’ श्री. पाटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

डॉ. फडकुले प्रतिष्ठान, संभाजीराव शिंदे विद्या मंदिर आणि सुशील रसिक सभेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रा. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.