आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Pravin Patkar Interview, Latest News In Divya Marathi

उपेक्षित महिलांची मुले आता पदव्या मिळवताहेत- डॉ. पाटकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुंबईतल्या कामाठीपुर्‍यात देहविक्रय करणार्‍या महिलांच्या मुलांसाठी शाळा सुरू करणारे डॉ. प्रवीण पाटकर यांना सोमवारी सोलापुरात मानाचा डॉ. निर्मलकुमार फडकुले समाजसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर प्रा. विलास बेत यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. उपेक्षित महिलांना ‘आदर्श माता’ बनण्याची प्रेरणा देणार्‍या डॉ. पाटकर यांची मुलाखत सोलापूरकरांना अंतर्मुख करून गेली.
प्रश्न : देहविक्रय करणार्‍या महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा कुठून अन् कशी मिळाली?
कुठून भावना निर्माण झाल्या ते शोधणे कठीण आहे; अन् ते अनाकलनीय आहे. परंतु माझ्या आयुष्याविषयी विचार करताना परिसरही सुंदर करण्याची प्रेरणा मिळत गेली.
प्रश्न : आसपास अनेक समस्या असताना कामाठीपुरा येथील उपेक्षित महिलांविषयी काम करावेसे का वाटले?
सेवादलाच्या माध्यमातून झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन समस्या समजून घेत होतो. विषमतेने भरलेल्या या समाजातील महिला मुंबईत आल्या. कामाठीपुर्‍यातील छोट्याशा घरांमध्ये व्यवसाय करू लागल्या. तान्हुल्या बाळांना झोपेचे औषध देऊन कॉटखाली ढकलले. ज्यांची मुले थोडीशी मोठी त्यांचीही जागा कॉटखालीच. ही चिमुकली डोळे मिटायची; परंतु कान बंद करणे अवघड होते. त्यामुळे कॉटवरील प्रकार त्यांना समजून यायचा. अशा घुसमटलेल्या स्थितीतील मुलांना बाहेर काढण्यासाठी शाळा सुरू केली. तिथेच झोपण्याची व्यवस्था केली. आज 300 मुले या शाळेत शिकतात. पदव्या मिळवत आहेत.
प्रश्न : अशा भीषण स्थितीतील मुले शिकू लागली; पण महिलांमध्ये काही बदल झाले का?
या महिलांना सतत कोणी तरी फसवत असतो. त्यामुळे घाणेरड्या जीवनातून त्यांची सुटका नाही. ग्राहकांकडूनच त्यांना व्यसन जडले. बहुतांश महिला दारू पिल्याशिवाय झोपत नाहीत. त्यांच्यातील बदल म्हणत असाल तर एकदा पोलिसांनी एका महिलेला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी सर्व महिला एक झाल्या. आयुक्तांनी चौकशी केली. संबंधितांना सूचना दिली. तेव्हापासून मारहाण नाही. या प्रकरणी पुढाकार घेतलेली ललिता पुढे महापालिका निवडणुकीसाठी उभी होती.
प्रश्न : यापैकी कुणाचे लग्न जमवण्याचे प्रयत्न झाले का?
लग्न म्हणजे पुनर्वसन असे मी मानत नाही आणि स्थितीवरचा उताराही नाही. लग्नासाठी कुणी भेटलाच तर तो दलालच असतो. त्यांना ‘फॅन्सी मॅन’ म्हणतात. अर्धा नवरा आणि अर्धा दलाल. तिच्या पैशावर जगणारा. त्याला काही अर्थ नाही.
प्रश्न : इतक्या मोठय़ा प्रमाणात अवैध मानवी वाहतूक सुरू आहे. त्यावर काही उपाय?
माणसे विकण्याचा धंदाच मोठय़ा प्रमाणावर फोफावला आहे. त्यावर उपाय म्हणून कायदे करणे, पोलिस आणि न्यायव्यवस्थेला प्रशिक्षण देणे या बाबी झाल्या. तरीही जागतिक पातळीवर अवैध मानवी वाहतूक सुरूच आहे. भारत, आफ्रिका आणि र्शीलंकेत ते मोठय़ा प्रमाणात वाढले. माणसे विकण्याच्या धंद्यात सुमारे 14 बिलियन डॉलर इतकी मोठी उलाढाल सुरू आहे. त्यामुळे त्यावरील जुजबी उपाय कुचकामीच वाटतात. परंतु हे भीषण वास्तव समोर ठेवून काम करावे लागेल, हे खरे.