आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तुटताहेत ड्रेनेज चेंबर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यावर करण्यात आलेले ड्रेनेजचे चेंबर अनेकवेळा तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. निकृष्ट कामामुळे असे प्रकार वारंवार घडत आहे. ड्रेनेजचे काम करताना महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने असे होत आहे. मात्र जडवाहतुकीमुळे असे प्रकार होत असल्याचे कारण महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. पण, याचा फटका नागरिकांना बसत आहे.
चेंबर तुटण्याचा विक्रम
अक्कलकोट रोड ते गांधी नगरमार्गे गोंधळे वस्तीला जाणा-या रस्त्यावर आठ ते नऊ ड्रेनेजचे चेंबर आहेत. या मार्गावर जडवाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. यामुळे या रस्त्यावरील ड्रेनेजचे चेंबर दर महिन्याला एकदा तुटताहेत. नागरिकांची ओरड झाल्यानंतर त्याची दुरुस्ती केली जाते. दुरुस्ती केल्यांनतर अजून महिन्याभरात पुन्हा तीच समस्या समोर येते. यामुळे रस्त्यावर ड्रेनेजची घाण पाणी पसरून दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच वारंवार याची दुरुस्ती करून खर्च केला जात आहे. जडवाहतुकीचे कारण दाखवून निकृष्ट कामाकडे डोळेझाक केली जात आहे.
स्लॅबला हवे 28 दिवस
ड्रेनेज चेंबरवर स्लॅब टाकल्यानंतर त्यावर पाणी साठवून 25 ते 28 दिवस तसेच ठेवून त्यावरून कुठलीही वाहतूक करू नये, असा नियम आहे. परंतु महापालिकाच याची अंमलबजावणी करत नाही. स्लॅब टाकले जाते मात्र त्याच्या बाजूने बॅरिकेड लावले जात नाही, लाल झेंडा लावला जात नाही, फलक लावले जात नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक दोन ते तीन दिवसांतच त्या स्लॅबवरुन सुरू होते. त्यामुळे स्लॅबचे अवघ्या दोनच दिवसांत तीन-तेरा होते.

नियमानुसार असे असावे बांधकाम ड्रेनेजचा आकार-3 बाय 4, खोली 4 ते 6 फूट, विटा 500 ते 700, सिमेंट 5 पोती, वाळू 3 ट्रॉली, खडी आर्धा ट्रॉली, सळई 30 ते 35 किलो, कालावधी 3 दिवस प्रत्यक्षात होते असे बांधकाम ड्रेनेजचा आकार-3 बाय 4, खोली 4 ते 6 फूट, विटा 500 ते 700, सिमेंट सव्वातीन पोती, वाळू दोन ट्रॉली, खडी आर्धा ट्रॉली, सळई 14 ते 15 किलो, कालावधी आठवडा

दुरुस्ती केली जात नसेल तर संबंधितांना नोटिसा बजावणार
अशोक चौक पोलीस चौकी समोर ड्रेनेज चेंबर वारंवार तुटत होते, वाहतुकीचा मुद्दा लक्षात घेता स्लॅबची जाडी डबल करण्यात आली. त्याचप्रमाणे संबंधित झोनच्या कनिष्ठ अभियंतानी प्रत्येक प्रभागातील ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करून घ्यावी. जर असे करत नसतील तर त्या सर्वांना सुचना देवू आणि नंतर नोटीसाही देवु. मोहन कांबळे, उप अभियंता जडवाहतूकीमुळे चेंबर तुटण्याचे प्रकार, कामाची पाहणी करु अक्कलकोट रोड ते गांधी नगर रस्त्यावरील ड्रेनेज चेंबर वारंवार तुटण्याचे प्रकार होत आहेत. याला जडवाहतुक जबाबदार आहे. जडवाहतुकीमुळे ड्रेनेज चेंबरची जाडी डबल केली, तरीही चेंबर तुटत आहेत.तसेच चेंबर बांधकामात कुठे नियमाप्रमाणे साहित्याचा वापर होत नसेल तर चौकशी करू. एम.बी. सांगलीकर, कनिष्ठ अभियंता, झोन कार्यालय क्रमांक तीन नियमानुसारच चेंबरचे काम होत आहे, रहदारीचा होतो त्रास निकषानुसार चेंबरचे काम करण्याचा प्रयत्न असतो. 3 बाय 4 च्या एका चेंबरच्या बांधकामास आठ पोती सिमेंट, 40 किलो सळई अशा प्रकारे साहित्य वापरतो. स्लॅबपुर्ण झाल्यानंतर 21 दिवस त्याचा वापर करू नये. पंरतु रहदारी जास्त असल्याने लवकरच वाहतुक सुरु होते. यापुढे तेथे बॅरीकेड व फलक लावून काम केले जाईल. प्रदीप खयानी, मक्तेदार