आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रभागा नदीत ड्रेनेजचे पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - चंद्रभागा नदी सध्या मैली झाली असून, आषाढी यात्रेच्या तोंडावरच पालिकेच्या कृपेमुळे चंद्रभागा नदीच्या पात्रात चक्क ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून पिणार्‍या वारकर्‍यांच्या र्शद्धेची पालिका जणू कुचेष्टा करत आहे.

आषाढी यात्रा अगदी तोंडावर आली आहे. आषाढी यात्रेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांपासून ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकार्‍यांपर्यंत सर्वांनी विविध शासकीय विभागातील अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या आहेत.

यात्रेशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांनी आतापर्यंत आपापल्या विभागाकडून करण्यात येत असलेली यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सब आलबेल असल्याचे कागदी घोडे नाचवल्याचेच या प्रकारावरून दिसते. गेल्या दीड महिन्यापासून चंद्रभागा नदीचे पात्र कोरडे पडलेले आहे.

पात्रामध्ये बर्‍याच ठिकाणी डबकेसदृश साठलेले पाणी दिसून येत आहे. अशाच प्रकारे पुंडलिक मंदिराजवळही सध्या डबक्यात पाणी साचले आहे. सध्या नदी पात्रात बहुतेक सर्व भागांत पंढरपूर शहरातील घाणीचे (ड्रेनेजचे) पाणी मिसळू लागले आहे. परगावाहून येथे आलेल्या वारकर्‍यांना पाण्याअभावी स्नानाऐवजी सध्या हात-पाय धुवूनच स्नान केल्याचे समाधान मानावे लागत आहे. त्या नंतर चंद्रभागेचे तीर्थ म्हणून हे घाणेरडे पाणी प्राशन करण्याची वेळ आली आहे.

शहरातील काही भागांतून आलेले ड्रेनेजचे पाणी साठवण्यासाठी पालिकेकडून चक्क वाळवंटामध्येच चर, खड्डे खोदण्यात आलेले आहेत. सध्या हे ड्रेनेजचे पाणी या खड्डय़ांमध्ये ओव्हर फ्लो झाल्यामुळे ते चक्क पवित्र असलेल्या चंद्रभागेत मिसळत आहे. वाळवंटामधून हे जे पाणी वाहत आहे, त्या मधूनच वारकर्‍यांना ये-जा करावी लागत आहे. ऐन आषाढीच्या तोंडावर सुरू असलेले हे कृत्य पालिकेने थांबवावे आणि वारकर्‍यांची कुचेष्टा थांबवावी.