आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्क ऑर्डरपूर्वीच विहिरींतील गाळ उपसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मक्तेदार निश्चिती आणि वर्क ऑर्डरचा थांगपत्ता नसताना शहरातील विहिरींमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी महापालिकेने विहीर अधिग्रहण न करताच गाळ काढून विहिरींवर पाइपलाइनसाठी लाखो रुपये खर्च केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. या पार्श्वभूमीवर वर्कऑर्डरविना गाळ काढण्याचे काम सुरू झाले कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.


शहरातील विहिरींच्या सर्वेक्षणाचा अहवाल एजन्सीने 8 मार्च रोजी महापालिकेकडे सादर केला. उन्हाळा परतीला लागला तरी अजून विहिरींमधील पाणी उपाशाची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या विहिरीतून पाणी उपशासाठी सुमारे चार कोटी 40 लाख 19 हजार 645 रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निधीतून दोन कोटी रुपये देण्याचे घोषित केलेले आहे. महापालिकेने दोन कोटी रुपयांमध्ये सात विहिरींचे पाणी स्रोत बळकटीकरणाचा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवला. या प्रस्तावात विहिरीतील पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी करणे, गाळ काढणे, विद्युत पंप बसवणे, फिल्टर युनिट बसवणे, सिन्टेक्स टाकी भरणे, टँकरसाठी रॅम्प तयार करणे आदी कामे सूचवण्यात आले आहे. या कामाची निविदा मागवण्यात आली होती. त्या निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत.


दर कमी असतील त्या मक्तेदारास बोलावून त्याच्याबरोबर वाटाघाटी केल्यानंतर त्याची निश्चिती करून वर्क ऑर्डर दिली जाते. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एकीकडे मनपाची कामे करण्यास मक्तेदार तयार नसल्याचे सांगितले जाते. विहिरींच्या गाळात मात्र कोण्या मक्तेदाराला आपले भविष्य दिसले हा संशोधनाचा विषय आहे.


मनपाचा प्रस्तावही अधुरा
गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्याचा प्रस्ताव योग्य पध्दतीने आणि दूरदृष्टीने तयार करण्यात आला नसल्याचे दिसत आहे. काही विहिरींमध्ये गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे विहिरींच्या संरक्षणासाठी स्लॅब किंवा लोखंडी जाळी बसवून विहिरींमध्ये गाळ साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. नगरसेवक दिलीप कोल्हे यांच्या पुढाकाराने जुनी मिल चाळीमधील विहिरीतून गाळ काढून विहिरीवर लोखंडी जाळी बसविली आहे. तशाच पध्दतीने पॅकबंद विहीर न केल्यास कोट्यवधींचा खर्च गाळात जाऊ शकतो.


लोकहित की हितसंबंध?
विडी घरकुल बी ग्रुप येथे आणि श्री रेवणसिध्द मंदिर येथील विहिरीतील गाळ काढण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. महापालिका अधिका-यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत. टेंडरपूर्वीच गाळ काढण्यात लोकहितापेक्षा हितसंबंधच अधिक दडले असल्याचे दिसून येत आहे.


कामाची खातरजमा करून घेऊ
विहिरी अधिग्रहण करूनच गाळ उपसण्याचे काम केले जाणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कोणाला वर्कऑर्डर देण्याचा आणि काम सुरू करण्याचा प्रश्नच नाही. गाळ कोण उपसतो आहे, याची खातरजमा करून घेऊ. पॅकबंद विहिरी कशा करता येईल, ते पाहिले जाईल.’’
बी. एस. अहिरे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका