आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकरीच्या चंद्रासाठी : विहीर खोदण्यात महिला अग्रेसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडी (जि. सोलापूर)- दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शासनाकडून कोणतीही मदतीची अपेक्षा न करता भूम व लातूर तालुक्यातून विहीर खोदण्यासाठी माढा तालुक्यामध्ये येऊन विहीर खोदकामात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आपला प्रपंच सांभाळत पोटाची खळगी भरीत आहेत, परंतु शिक्षणाविना मुलांचे भवितव्य मजुरी करण्याकडेच जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.

माढा तालुक्यातील चिंचगाव येथील रामचंद्र उबाळे यांच्या शेतीमध्ये विहीर खोदण्यासाठी मजूर मिळत नसल्याने त्यांनी भूम व लातूर तालुक्यातून विहीर खोदण्याचे काम करणारे पाच पुरुष व पाच महिला बोलावून काम सुरू केले. विहिरीवरील क्रेन स्वत: महिलाच चालवत आहेत. विहिरीवरील सर्व कामे महिला पार पाडतात तर विहिरीतील खोदाई पुरुष करीत आहेत. एका महिन्यामध्ये त्यांनी 10 फूट खोदकाम महिलांच्या साहाय्याने पूर्ण केले आहे.

खोदकामावर चालते यांचे घर- सुरेश सावळा शिंदे, शंकर मंजूळकर, राजू लक्ष्मण विटकर, महेश लक्ष्मण विटकर, सुभाष लक्ष्मण विटकर, शशिकला सुभाष विटकर, कमलाबाई राजू विटकर, सुनीता महेश विटकर, बायडाबाई शंकर मंजूळकर खोदकाम करतात तर सुरेखा शिंदे क्रेन चालवतात.

असे आहेत दर- आठ हजार रुपये प्रती फूट याप्रमाणे विहीर खोदाईचे काम स्वीकारण्यात येते.
भूम व लातूर तालुक्यातील वडार समाजाचे मजूर मोठय़ा प्रमाणावर आहेत.
गेल्या 15 वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी हे मजूर विहीर खोदाई करतात.
1 लाख रुपयांत 10 फूट विहीर खोदून देतात.

- भूम व लातूर भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कामे नाहीत. यासाठी माढा तालुक्यात कामासाठी आलो आहोत. विहिरीचे खोदकाम मिळेल तेथे काम करण्याची तयारी आहे. माढा तालुक्यामध्ये विहिरीचे काम करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आपल्या गावचा परिसर सोडून येथे कामासाठी आलो आहोत.'' सुरेश शिंदे, खोदकाम करणारे मजूर, भूम, जिल्हा उस्मानाबाद.