आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस लांबल्यामुळे सोलापूरसाठी पाणीटंचाई आराखड्याचे काम सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पावसाळ्याचा जून महिना कोरडाच गेला. जुलैचा महिना सुरू झाला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणा-या उजनी, टाकळी आणि हिप्परगा तलाव या तीनही स्रोतातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने अशीच ओढ दिली तरी 10 ते 15 ऑगस्टपर्यंत शहरातील पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसला तरी भविष्यात काय होईल हे सांगणे कठीण आहे.

शासनाच्या आदेशानुसार महापालिकेकडून टंचाई आराखडा तयार करण्यात येत आहे. हद्दवाढ आणि गावठाण अशा दोन प्रकारात आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांनी दिली.

शहरासाठी अडचण नाही
- उजनीतील पाणी यापुढे फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उजनी धरणातून शहरासाठी पंपिंग करून पाणी घेण्यास अडचण नाही. तेथील पाण्याची पातळी घसरली तरी दुबार पंपिंग करून पाणी घेता येईल. गरज पडल्यास आगामी काळात औज बंधा-यासाठी पुन्हा पाणी सोडून ते भरून देता येईल.’’ अजय दाभाडे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता

टंचाई आराखड्याचे काम सुरू
- शहरात आगामी काळात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी महापालिका शासनाच्या आदेशानुसार टंचाई आराखडा तयार आहे. दोन दिवसांत ते पूर्ण करून शासनाकडे सादर करण्यात येईल. हद्दवाढ आणि शहर असे दोन आराखडा तयार करण्यात येत आहेत.’’
विजयकुमार राठोड, प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता
अशी आहे सोलापूरसाठीच्या जलस्रोतांची स्थिती

औज बंधारा - औज बंधा-यातून 70 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. आताची तेथील पातळी 3.8 मीटर आहे. तो पाणीसाठा 15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. आगामी काळात शहरासाठी औज बंधा-यात पाणी सोडण्याचे नियोजन आजतरी नाही. गरज वाटल्यास औज बंधा-यात एक पाळी पाणी सोडता येईल, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधीकरणाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी दिली.

उजनी धरण- उजनीतून शहरासाठी 60 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तेथे पाण्याचा साठा वजा 23 टक्के इतका आहे. वारीसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. ते सोडल्यास पाण्याची पातळी वजा 26 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. वजा 32 टक्के पाणीपातळी गेल्यास तेथे दुबार पंपिंग करावे लागणार. दुबार पंपिंग करण्याची तयारी मनपाने केली असून, त्यांचे टेंडर काढले आहे.

हिप्परगा तलाव - सोलापूरच्या उत्तर दिशेला तुळजापूर रोडलगत हिप्परगा तलाव आहे. सोलापूरच्या काही भागासाठी या तलावातून पाणीपुरवठा होतो. या तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. मागील दीड महिन्यापासून तेथे दुबार पंपिंग करत आहे. तेथून चार ते पाच एमएलडी इतका तोकडा पाणीपुरवठा होत आहे. पुढील काळात येथील जलस्रोत पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.
फोटो - संग्रहित