आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीटीएड’ला नवा लूक, डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डी.एड.बी.एड.च्या सध्याच्या स्थितीबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन अणि प्रशिक्षण परिषद यांचे संशोधन चालू आहे. त्याचा घसरता आलेख सुधाण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम ‘डीटीएड' आता डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन (डीएलएड) नावाने ओळखला जाणार आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांपासून बदलण्यात येणार असून त्याचा आराखडा देखील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘डीटीएड'ला देण्यात येणारा हा नवा लूक विद्यार्थ्याच्या पसंतीला पडून प्रवेश घेणार्‍यांची संख्या वाढणार का, याबाबत उत्सुकता आहे.

दिवसेंदिवस ‘डीटीएड'ला प्रवेश घेणार्‍यांची संख्या कमी होत असून त्याची विद्यार्थ्यांमध्ये क्रेझही कमी होत आहे. या अभ्यासक्रमाच्या कॉलेजची वाढलेली संख्या अध्यापनाचा घसरलेला दर्जा यावर सातत्याने टीका केली जाते. त्यातच आता ‘एनसीएफटीई-२००९' ‘एसीटीई रेग्युलेशन-२०१४'मधील मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डीएलईडी) पुनर्रचित केलेला आहे.

क्रेझ पुन्हा वाढणार
डीएडची क्रेझ पूर्वी खूप होती. त्यावेळी प्रवेशाची चढाओढ लागत होती. बदलत्या परिस्थितीनुसार यामध्ये बदल करणे आवश्यक होते. मात्र त्या पध्दतीने झाले नसल्याने ही क्रेझ कमी झाली आहे. यावर संशोधन परिषदेचे काम चालू आहे. त्यामुळे ही क्रेझ पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. - नामदेव जरग, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

असा असेल नवा आराखडा
नव्याआराखड्यानुसार प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देणे, विद्यार्थ्यांना २० आठवडे शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करणे, अशा काही मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एटीकेटी असावी का, पदविका अभ्यासक्रमातही सेमी इंग्रजी सुरू करावे का, कार्यानुभव, कला, शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा कॉलेज स्तरावर ठेवता ती परिषदेकडून घेण्यात यावी का, याबाबत परिषदेने अभिप्राय मागवले आहेत. परिषदेच्या www.mscert.org.in या वेबसाइटवर नवीन आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर अभिप्राय मागविण्यात येत आहेत.

पदविकेसाठीही श्रेयांक?
नव्याआराखड्यानुसार माहिती तंत्रज्ञान हा स्वतंत्र विषय ठेवता नियमित विषय शिकवताना माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे शिकविण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार आता पदविका अभ्यासक्रमासाठीही श्रेयांक पद्धत लागू होण्याची शक्यता आहे.