आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Babasaheb Ambedkar Shivappa Patil's Hanging Execution Suspended

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे टळली होती होटगीच्या शिवप्पा पाटलांची फाशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एका खूनप्रकरणी इंग्रजांनी माझ्या वडिलांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच त्यांची त्यातून निदरेष सुटका होऊ शकली आणि आमच्या पाटील घराण्याची वंशवेल बहरू शकली. त्यामुळे आजही आमच्या घराण्यात देवदेवतांच्या पूजेआधी आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा होते. गेल्या 70 वर्षांपासून ही परंपरा आम्ही जपली आहे. बाबासाहेब दैववादी नव्हते. महापुरुषांचे दैवतीकरण करणेही समाजहिताचे नाही. तरीही तो महामानव आमच्यासाठी दैवतच आहे. कृतज्ञतापूर्ण शब्दांत सांगत होते माजी आमदार (कै.) गुरुनाथ पाटील यांचे बंधू सिद्रामप्पा पाटील. त्यांच्या शब्दाशब्दांमधून व्यक्त होत होते बाबासाहेबांप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि अभिमान.

माझे वडील शिवप्पा पाटील. होटगी (ता. दक्षिण सोलापूर) गावची पाटीलकी सांभाळायचे. परिसरात मोठा मान. मात्र, केवळ त्यांच्याच शेतात एक मृतदेह सापडला आणि या कारणावरून पोलिसांनी त्यांना विनाचौकशी अटक करून तुरुंगात डांबले. 1936 ची ही घटना. याप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ते कारागृहात असतानाच माझे मोठे बंधू शरणबसप्पा यांचा जन्म झाला होता. वंशाचा दिवा जन्मल्याने घरी आनंदाचे वातावरण असले तरी एकुलत्या एका मुलाला फाशीची शिक्षा झाल्याने माझे आजोबा पुंडलिक पाटील यांचा उर्वरित पान 12

आधारच तुटला. त्यांनी पनवेल येथे जाऊन हा खटला लढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साकडे घातले. बाबासाहेब तेथील फार्महाऊसवर विर्शांतीसाठी येत असत. ही माहिती आमचे नातेवाईक आठवणे यांना होती. त्यांच्या माध्यमातून आजोबांनी बाबासाहेबांची भेट घेतली. परंतु माझ्या आजोबांना कन्नडशिवाय अन्य भाषा येत नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांना खटल्याविषयी नेमके कळेना. त्यांनी सोलापुरातील अण्णासाहेब ऐदाळे यांना बोलावून घेतले. र्शी. ऐदाळे यांनी त्यांना या खटल्याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बाबासाहेबांनी हा खटला विनाशुल्क लढवण्याची तयारी दर्शवली. सत्र न्यायाधीश युरोपीयन असल्याने त्यांना आरोपीची भाषा कळत नाही, त्यामुळे अपिलात हा खटला विजापूर येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली, ती मान्य झाली. बाबासाहेब 24 एप्रिल 1937 रोजी वळसंग येथे आले होते. तेथील कार्यक्रम आटोपून रेल्वेने विजापूरला गेले. त्यांनी न्यायालयात केलेल्या बिनतोड युक्तिवादाने माझ्या वडिलांची त्यातून निदरेष सुटका झाली. त्यानंतर माझ्या आजीने गहिवरत मुलगा शरणबसप्पास बाबासाहेबांच्या ओटीत घातले.

क्रांतिसूर्याच्या दर्शनासाठी गर्दी
हा खटला डॉ. आंबेडकर लढवणार असल्याचा विषय त्यावेळी चर्चेचा बनला होता. सोलापूर व विजापूर जिल्ह्यातील लोकांना त्याविषयी उत्सुकता होती. त्यामुळे बाबासाहेबांना पाहण्यासाठी आणि त्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी त्यांनी विजापूरच्या न्यायालयात गर्दी केली होती. न्यायालयाच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
मिरवणुकीचेही होते स्वागत
पाटील कुटुंबीय पुढाकार घेऊन होटगी येथेही आंबेडकर जयंती उत्सव साजरा करायचे. माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव हरिष पाटील हे आता सोलापुरातील शिक्षक सोसायटीत राहण्यास आहेत. तरीही परंपरेत खंड पडला नाही. याठिकाणीही ते आंबेडकर जयंतीदिनी निघणार्‍या मिरवणुकीचे घरासमोर स्वागत करतात. आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. आंबेडकरांच्या ऋणाचे पाटील कुटुंबीय उतराई करू शकणार नसल्याची भावना हरिष पाटील यांनी व्यक्त केली.

वडिलांची सुटका झाल्यानंतर माझे बंधू गुरुनाथ, बहीण हिराबाई व माझा जन्म झाला. अन्यथा आम्ही हे जगही पाहिले नसते. पुढे गुरुनाथ आमदार झाला. पाटील घराण्याने राजकीय क्षेत्रात नावलौकिक कमावला, तो फक्त बाबासाहेबांमुळेच. आम्ही त्यांच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही. सिद्रामप्पा पाटील, शिवप्पा पाटील यांचे चिरंजीव

बाबासाहेबांच्या रूपाने आमच्या पाटील कुटुंबासाठी देवच धावून आला. आम्ही त्यांना देवासमानच मानतो. जयंतीदिनीही सर्व कुटुंबीय एकत्र येऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतो. शिवानंद पाटील, नगरसेवक, शिवप्पा पाटील यांचे नातू