आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमुळे रखडली 200 बसची खरेदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्राच्या योजनेतून 200 बस खरेदी करण्यासाठी महापालिका परिवहन समितीची मंगळवारी दुपारी बोलावलेली सभा पुन्हा तहकूब करण्यात आली. या प्रकारामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधकांना घेऊन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना पुन्हा सभा घेण्याचे पत्र दिले. त्यावर 7 जणांच्या सह्या आहेत. 12 पैकी 7 जण एकत्र आल्याने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर होण्याची शक्यता आहे.


केंद्राच्या जवाहरलाल नेहरू शहर पुनर्विकास योजनेतून 200 बस खरेदीचा हा प्रस्ताव आहे. 176 कोटी रुपयांची ही योजना राबवण्यासाठी आयुक्त गुडेवार यांना सर्वाधिकार देण्यात आले. त्यानुसार प्रशासनाने बस खरेदीच्या निविदा मागवल्या. टाटा आणि अशोक लेलँड या कंपन्यांनी निविदा भरल्या. सर्वात कमी दर देणार्‍या कंपनीची निविदा मंजूर करण्याचा विषय परिवहन समितीकडे पाठवण्यात आला. त्यावर 12 फेब्रुवारीच्या आत निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सोमवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. तीत सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी सदस्यांनी प्रस्ताव वाचण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सोमवारची सभा अनिर्णीत ठेवून, मंगळवारी दुपारी बोलावण्यात आली होती. परंतु समिती सभापती सुभाष चव्हाण यांनी शोकप्रस्ताव ठेवून सभा तहकूब केल्याचे सांगितले.


पुढे काय होईल?
0 समिती सदस्यांची संख्या 12 आहे. काँग्रेसचे 5 सदस्य सोडले तर प्रस्तावाच्या बाजूने इतर 7 जण आहेत. त्यांनी तातडीने सभा बोलावण्याचे लेखीपत्र दिले. त्यामुळे त्यांच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
0 सभा बोलावण्याचे अधिकार सभापतींनाच असतात. आयुक्तांनी नगरसचिवांना इतर सदस्यांच्या सभा बोलावण्याच्या मागणीचे पत्र दिले तरी सभा कधी बोलवायची हे सभापतीच ठरवतात.
0 बुधवारी (दि. 12) या प्रस्तावावर निर्णय न झाल्यास योजनेचा लाभ घेण्यात तांत्रिक अडचणी उद्भवतील. प्रसंगी योजना हातून जाण्याची शक्यताही आहे.


सर्मथकांचे बहुमत
सभापतींनी सभा तहकूब केल्यानंतर काँग्रेसचे सदस्य त्यांच्यासोबत निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, माकपचे सदस्य एक झाले. त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणा दिल्या. सभापतींना पळपुटा ठरवून त्यांचा निषेध केला. त्यानंतर पुन्हा सभा घेण्याचे मागणीपत्र घेऊन सात सदस्यांनी आयुक्त गुडेवार यांच्या घरी धाव घेतली. या पत्रावर विरोधी पक्षनेते मल्लिनाथ याळगी, अनिल कंदलगी, मल्लेश बडगू, महेश चव्हाण, सातप्पा चिनकेरी, श्रीनिवास दायमा आणि सिद्धप्पा कलशेट्टी यांच्या सह्या आहेत. हे पत्र श्री. गुडेवार यांनी नगरसचिव ए. ए. पठाण यांच्याकडे तातडीने पाठवले. त्यानुसार पुन्हा सभा झाल्यास या सात जणांच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
आयुक्त, विरोधक काय म्हणाले..


दर कमी होणार नाहीत
मोटार उत्पादक कंपन्यांचे दर देशभरात एकच असतात. परिवहन सभापतींना त्याचे दर कमी करून देतो, असे कधीच म्हटले नाही. आलेल्या निविदेतून सर्वात कमी दर देणार्‍या कंपनीची निविदा मंजूर करायची आहे. त्यालाही असा विलंब होत असेल तर योजनेचा लाभ घेण्यात अडचणी येतील.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त


मतदानाची तयारी केली
सोमवारच्या सभेतच काँग्रेसच्या सदस्यांचा विरोधी सूर होता. तो ओळखून मंगळवारची सभा तहकूब होणार नाही, याची काळजी घेतली होती. विरोधी सूर आला तर मतदान पद्धतीने प्रस्ताव मंजूर करण्याची व्यूहरचना केली होती. पण सभापतींनी सभेतूनच पळ काढला.’’ सिद्धप्पा कलशेट्टी, माकप


आर्थिक लाभाची लालसा दिसते
कुठल्याही छोट्या योजनेतून आर्थिक लाभ करून घेणारी काँग्रेसी प्रवृत्ती 176 कोटींसारख्या मोठय़ा योजना एवढय़ा सहजपणे मंजूर होऊ देतील काय? केवळ आर्थिक लालसेपोटी काँग्रेसचे सदस्य अडून बसले. पण आम्ही बहुमताच्या जोरावर त्यांचे मनसुबे हाणून पाडू.’’ अनिल कंदलगी, भाजप


वेळ मागितल्याची चूक केली
सोमवारच्या सभेत सभापती एका बाजूने आणि आम्ही सदस्य दुसर्‍या बाजूने होतो. योजना काय आहे, हे समजून घेण्यासाठी आम्ही फक्त 24 तासांची वेळ मागून घेतली. याच कालावधीत काँग्रेसचे बनत असलेले मत बिघडले. आता वाटते वेळ मागितल्याची चूक झाली काय?’’ मल्लेश बडगू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष


सुशीलकुमार शिंदे यांचेही काँग्रेस सदस्य ऐकत नाहीत?
जवाहरलाल नेहरू शहर पुनर्विकास योजनेचा लाभ सोलापूरला मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुढाकार घेतला. आयुक्त गुडेवार यांना दिल्लीला बोलावून त्यासंदर्भातील प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले होते. खरेदीचे अधिकार गुडेवार यांनाच देण्याचे ठरवण्यात आले. सोलापूरच्या काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व असणार्‍या गृहमंत्री शिंदे यांच्या चांगल्या कामात परिवहनचे सदस्य अडवणूक करत आहेत. याचाच अर्थ काँग्रेसचे सदस्य शिंदेंचेही ऐकत नाहीत का, असा प्रश्न एका सदस्याने केला.


सभापती श्री. चव्हाण यांना थेट सवाल
प्रश्न : बसचे दर जादा असल्याचे आजच कसे कळले?
चव्हाण : आयुक्त गुडेवारसाहेबांनी, दर कमी करून देणार असल्याचे सांगितले होते; पण तसे झाले नाही. दुरुस्ती आणि देखभालीचा खर्चही अवास्तव वाटतो.
प्रश्न : दुखवट्याचा प्रस्ताव सोमवारच्या सभेत आला नाही. मंगळवारी कसा आला?
चव्हाण : सभा तहकूब करण्यासाठी असा प्रस्ताव आणावा लागतो ना..
प्रश्न : काँग्रेस भवनमध्ये सकाळच्या बैठकीत काही ठरले काय?
चव्हाण : नाही. तिथे काँग्रेसच्या मेळाव्यासंदर्भात चर्चा झाली.
प्रश्न : पुढची सभा आता कधी?
चव्हाण : आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर ठरवू.