आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितच्या हॅट्ट्रिकमुळे एमसीए ग्रीन विजयी, ब्ल्यू संघावर १० धावांनी केली मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ऑफ ब्रेक गोलंदाज रोहित डम्बालेने धारदार ऑफ ब्रेक माऱ्याद्वारे हॅट्ट्रिकसह घेतलेल्या चार बळींच्या आधारे एमसीए ग्रीन संघाने आंतर शिबिर क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात ब्ल्यू संघाचा १० धावांनी पराभव करून विजय मिळवला.
यशोदानगर मैदानावर झालेल्या या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करताना एमसीए ग्रीन संघाने २० षटकांत चार फलंदाज गमावून १५६ धावा उभारल्या. दुर्गेश तिवारीने चौफेर फटकेबाजीसह पाच चौकारांच्या मदतीने २१ चेंडूत ५३ धावांची अर्ध शतकी खेळी केली. रोहित डम्बालेने तीन चौकार एका उत्तुंग षटकारासह ३२ धावांची आक्रमक खेळी केली. तर मानस कुथेने दोन चौकार ठोकून २२ धावा केल्या. ब्ल्यू संघाकडून मध्यमगती गोलंदाज ऋत्विक सावरकरने ३० धावांत दोन बळी घेतले. खुशीत पांडेने १८ धावांत एक आणि सिद्धांत खेटेने २६ धावांत एक फलंदाज बाद केला.
प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या एमसीए ब्ल्यू संघानेही धावसंख्येचा पाठलाग करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद झाल्यामुळे त्यांना १० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी २० षटकात सर्व बाद १४६ धावा उभारल्या. प्रथमेश तिवस्करने प्रयत्नांची शर्थ करताना चार चौकारांसह चिवट ४० धावा तडकावल्या. खुशीत पांडेने दोन चौकार ठोकून ३८ आणि ऋत्विक सावरकरने तीन चौकारांच्या मदतीने २८ धावांची खेळी केली. ग्रीनकडून भेदक आॅफब्रेक मारा करणाऱ्या रोहित डम्बालेने चार षटकात १० धावांच्या मोबदल्यात हॅट्ट्रिकसह चार फलंदाज बाद करून ब्ल्यूच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. लेग स्पिनर आयुष सोनारेने १८ धावांत तीन आणि मध्यमगती प्रसाद केळकरने धारदार माऱ्यासह २० धावांत तीन फलंदाज टिपून संघाला यश मिळवून दिले.

रेडसंघाचा यशस्वी पाठलाग : वेदातचिंचेची दमदार अर्ध शतकी खेळी अन् रविराज मानेच्या भेदक लेग स्पिन माऱ्यामुळे एमसीए रेड संघाने १६३ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करून आंतर शिबिर क्रिकेट स्पर्धेत यलो संघाचा पाच गड्यांनी दणदणीत पराभव केला.
यलो संघाने आधी फलंदाजी करताना २० षटकात चार बाद १६२ धावा उभारल्या. तनिश श्रृंगारेने तडफदार फलंदाजीसह आठ चौकार एक गगनचुंबी षटकार खेचून ६० धावांची अर्ध शतकी खेळी केली. यश चव्हाणने तीन चौकार एका षटकाराच्या मदतीने ४० धावा तडकावल्या. मात्र अन्य फलंदाजांनी सामनावीर रविराज मानेच्या आॅफ स्पिन गोलंदाजी पुढे शरणागती पत्करल्याने त्यांना अपयश सहन करावे लागले. रविराजने चार षटकात दोन निर्धाव टाकून २७ धावांत चार फलंदाजांची शिकार केली. रेड संघाने १८.२ षटकात पाच फलंदाजांच्या मोबदल्यात १६३ धावांची विजयी लक्ष्य गाठले.
वेदांत चिंचेने तडाखेबंद फलंदाजी करून सात चौकारांच्या मदतीने ५२ धावा उभारल्या. रविराज मानेने तीन चौकारांसह २७ धावा पटकावल्या तर अनिकेत कोलतेने दोन चौकार ठोकून २६ धावांची खेळी केली. यलो संघाचा लेग स्पिनर सत्यम देशमुखनं २२ धावांत दोन फलंदाज टिपले. तर मध्यमगती गोलंदाज संकेत तिवारीने २८ धावांत एक गडी बाद केला.
तीन अर्धशतके, एक हॅट् ट्रिक, ओव्हर हॅट् ट्रिक
आंतरशिबिर क्रिकेट स्पर्धेत वेदांत चिंचे, तनिश श्रृंगारे, दुर्गेश तिवारी या तिन्ही फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करून तीन अर्ध शतकी खेळी केल्या. तिघांनीही संयमी आणि चिवट फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्याचप्रमाणे रोहित डम्बालेने अप्रतिम आॅफब्रेक गोलंदाजी करून केवळ दहा धावांत हॅटट्रिक सह चार फलंदाजांचा बळी घेतला. त्याच्या गोलंदाजी पुढे फलंदाजांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रविराज मानेने ऑफ स्पिन गोलंदाजी करून ओव्हर हॅटट्रिक सह चार फलंदाज बाद केले. त्याची हॅटट्रिक थोडक्यात हुकली. सलग दोन फलंदाज बाद केल्यानंतर नंतरच्या चेंडूवर तो बळी मिळवू शकला नाही. मात्र चौथ्या चेंडूवर त्याने आणखी एक विकेट घेतली.
बातम्या आणखी आहेत...