आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचा बहाणा करून पैसे उकळण्याचा शहरात नवा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वो, बघून चालवता येत नाय काय गाडी? आत्ता जीव गेला असता तर काय भरून देणार काय? चल बे, उतर खाली, चल पोलिसांकडे अशी वाहन चालकाला दमदाटी करत शेवटी तोडपाणी करण्याचा नवा फंडा काही युवकांनी शोधलेला दिसून येतो आहे. अशा घटनांच्या नोंदी पोलिस ठाण्यात कमी असल्या तरी शहरात अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे

विशेषत: एकट्या दुकट्या वाहन चालकाशी भांडण करून त्याच्याकडून काही रक्कम उकळली जाते. शहराच्या विविध भागांत अशा घटना घडत असल्याचे दिसून येते. भरपाईपोटी रकमा उकळण्याच्या या प्रकारात वाढ झाली असली तरी पोलिसांपर्यंत शक्यतो अशी प्रकरणे जात नाहीत. साहजिकच या घटनांची नोंद होत नाही. अशा किरकोळ घटनांमध्ये वेळप्रसंग पाहून तोडपाणी करून वाद मिटवला जातो. यदाकदाचित प्रकरण वाढले तरी पुढील संभाव्य खर्च लक्षात घेतला तर 200 ते 500 रुपयांत प्रकरण मिटवणे श्रेयस्कर मानले जाते.

स्वॉफ्ट टार्गेट म्हणजे काय
परगावातील चारचाकी वाहन, विशेषत: ट्रक किंवा नवी दुचाकी, एखादे दुसरे सहकुटुंब चाललेले वाहन यांना टार्गेट केले जाते. नवे वाहन, चालवणारा नवखा पोरगा असलेला चालक, नवी दुचाकी, नंबर प्लेट नसलेली दुचाकी आदी शक्यतो स्वॉफ्ट टार्गेट ठरतात. कारण, वाद पेटला तरी ही मंडळी नमते घेतात. काही पैसे देऊन प्रकरण मिटवतात.

दोनशे ते तीनशेची होते मागणी
एखादी नवी दुचाकी, चार चाकी रस्त्यावर जाताना दिसली की काही तर खुसपट काढून हेरले जाते. धक्का का मारला? कट का मारला? जीव घेतो काय? असे विचारत नाहक वाद उत्पन्न करायचा आणि भरपाईपोटी वाहन चालकाकडून 200 ते 500 रुपये उकळायचे. असला प्रकार सोलापुरात वाढलेला दिसून येत आहे. रस्त्यावर भांडण करून दबाव वाढवून प्रकार विकोपाला नेणे, आणि शेवटी 100 ते 500 रुपये मागून भांडण मिटवून घेणे असला प्रकार सोलापुरात नेहमी दिसून येतो आहे. राष्ट्रीय महामार्गावर सर्रास हा प्रकार होताना दिसतो.

1 विजापूर रस्त्यावर तर ट्रक चालकाला भररस्त्यावर अडवण्याच्या घटना घडतात. यामध्ये दुचाकीवर जाणारे दोन-तीन युवक एखाद्या ट्रकच्या पुढे जातात.
2 ट्रक चालकाने हॉर्न वाजवून इशारा दिला की मुद्दाम कट मारला असा कांगावा होतो. ट्रक चालकाच्या पुढे दुचाकी लावून हमरीतुमरीची भाषा सुरू होते.
3 वेळप्रसंगी ट्रक चालकाला खाली खेचून मारण्याचीही तयारी असते. घाबरलेल्या चालकाला काय करावे समजत नाही. चालकासाठी नवा प्रदेश असतो.
4 वाद झाल्यास ट्रकच्या पाच ते दहा हजार रुपयांच्या काचा फोडण्याची भीती असते. शिवाय अशा वादात वेळप्रसंगी मदतीला कोणी यायची शक्यताही नसते.

गंभीरतेनुसार 100 ते 500 द्यावेच लागतात
एसटी स्टँड, स्टेशन, बाळीवेस परिसरात एखाद्या गाववाल्या किंवा बाहेर गावातील दुचाकीस्वार दिसला की कट का मारला बे? असे म्हणत दोघे तिघे युवक वाहन चालकासमोर उभे ठाकतात. गांगरलेला दुचाकीस्वार माझी काहीच चूक नाही ओ, तुम्हीच आडवे आलात, असे म्हणत असतो. पण वाद पेटतोच. घे गाडी बाजूला असे म्हणत प्रकरण गंभीर असल्याचे भासवले जाते. वाहनचालक कसाबसा आपली काहीच चूक नसल्याचे सांगत असतो, पण त्याचे ऐकून न घेता चावी काढून घेण्याचा प्रकार होतो. प्रकरण आणखीच चिघळते. शेवटी वाद विकोपाला जात आहे, असे कळून चुकलेला दुचाकीस्वार काय नुकसान झाले हे विचारतो. प्रकरणाच्या गंभीरतेनुसार 100 ते 500 रुपये द्यावेच लागतात.

जबरी चोरीसारखाच प्रकार, नागरिकांनी तक्रार करावी
- वाहनचालकांना नाहक अडवून काही रक्कम उकळणे, हा प्रकार जबरी चोरीच्या प्रकारात मोडतो. अशा प्रसंगी सरळ पोलिसांची मदत घ्यावी. किंवा समोरच्या वाहनाचा क्रमांक टिपून त्याची तक्रार जवळच्या पोलिस स्थानकात करावी. सोलापुरात अशा काही घटना घडल्याचे पोलिसांच्या निदर्शनासही आले आहे. अशा तीन घटनाही नजिकच्या काळात घडल्या, त्याची नोंद पोलिसांमध्येही आहे. नागरिकांनी तक्रारी कराव्यात, पोलिस निश्चित मदतीला आहेत,
खुशालचंद बाहेती, सहाय्यक पोलिस आयुक्त

सक्षम पुराव्याची गरज
- वाहनधारकांना नाहक अडवून काही रक्कम मागण्याचा प्रकार निश्चितच पोलिसात तक्रार दाखल करण्यासारखा आहे. अशा घटनेवर पायबंद घालण्यासाठी कायदा कडक आहे. तक्रार दाखल करणा-याकडे सक्षम पुरावा असणेही गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल होतात, असा अनुभव आहे. अ‍ॅड. स्वाती बिराजदार, वकील

पोलिसांची मदत घ्या
ग्रामीण भागात अशा घटना सर्रास घडत असल्याचे दिसून येते. शहरी भागात अशा घटना घडत असतील तर वाहनचालकांनी धीटपणे परिस्थिती हाताळावी. पोलिसांची मदत घ्यावी. खरेतर वाहनचालक परगावातील असतो, कधी सहकुटुंब असतो. तो प्रसंगी नमते घेतो. शे दोनशे रूपये देऊन सुटका करून घेतो. पण अशा वेळीच थोडीसी सावधानता बाळगली तर मार्गही निघतो.पोलिसांनीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रा. तुकाराम शिंदे, सोलापूर