आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Duplicate Pass Issue I Natya Sammelan, At Solapur

आयोजकांनीच तयार केली बनावट पास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयोजकांनीच तयार केले बनावट पास

पंढरपूर-येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी स्थानिक आयोजकांनी र्मजीतील लोकांना प्रवेश देण्यासाठी बनावट पास तयार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाट्यसंमेलनातील कार्यक्रमांचा आस्वाद घेणार्‍या खर्‍या पासधारकांना मात्र वंचित राहावे लागले आहे.

नाट्य परिषदेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडून कमी पास देण्यात आल्याचे सुरुवातीपासूनच येथील स्थानिक पदाधिकारी सांगत होते. कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी नाट्यरसिकांकडून पासेसची स्थानिक पदाधिकार्‍यांकडे मागणी केली जात होती. स्थानिक सदस्यांपैकी काहींनी व्हीव्हीआयपी, व्हीआयपी तसेच पत्रकारांसाठीचे पास कॉम्प्युटरवर स्कॅन करून त्याच्या प्रती आपल्या नातेवाईक तसेच र्मजीतील लोकांना वाटले. एवढय़ावरच हे महाभाग थांबले नाहीत. त्यांनी स्वयंसेवकासाठीचे असणारे पासदेखील बनावट पद्धतीने तयार केले आणि आपल्या गल्लीबोळांमधील मित्रांना वाटल्याचे बोलले जात आहे. नाट्यसंमेलनातील बहुचर्चित कार्यक्रमावेळी बनावट पास असलेल्या मंडळींनी जागा अडवून बसल्यामुळे खर्‍या पासधारकांना मात्र गैरसोयीला सामोरे जावे लागले. स्थानिक पदाधिकार्‍यांपैकी कोणी असे बनावट पास छापले, याचा शोध घ्यावा आणि त्यांची सदस्यपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी आहे.

माहिती घेणे सुरू
खरे पास व बनावट पास या दोन्हींची आपण खात्री केली आहे. बनावट पासच्या लेसवर 94 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असे छापण्यात आल्याचे दिसत नाही. मूळ पासवर मात्र असे छापण्यात आलेले आहे. हे पासेस कुठून आले याबद्दल माहिती घेत आहोत. अँड. विवेक चौंडावर, प्रसिद्धी विभागप्रमुख, नाट्यपरिषद शाखा, पंढरपूर