आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडगार बर्फाचा मोह पडू शकतो महागात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये बर्फाचा उपयोग होतो. बर्फ तयार करणार्‍या कारखानदारांनी पाण्याचे नमुने दर तीन महिन्यांतून तपासणे गरजेचे आहे. परंतु असा बर्फ खाण्यासाठी विकणार्‍या कारखान्यांवर कारवाई केली जात नाही. मद्यामध्ये वापरले जाणारे बर्फाचे चौकोनी खडे हे घरगुती स्वरूपात उत्पादित केले जातात. अशा उत्पादकांनी कोणाचीही परवानगी घेतलेली नाही. याकडे अन्न व भेसळ विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. परंतु नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बर्फ किंवा इतर पदार्थ सेवन करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.

उन्हाळा आला की आपण अपसूकच शीतपेयांकडे वळतो. बर्फ कारखान्यासमोर ‘अखाद्य बर्फ’ अशा आशयाचा फलक लावूनही लोक बर्फ आणतात आणि त्याचे गोळे करून विकतात. तसेच याचा वापर शीतपेयांमध्ये सर्रास होत असतो. बर्फ गोळे आणि त्याला वापरणारे रस हे आरोग्यासाठी योग्य आहे की नाही याची आपण खातरजमा करीत नाही. अन्न व भेसळ प्रशासन आणि महापालिकेकडून दरमहा या बर्फाची पाहणी करणे अत्यावश्यक असताना असे हेात नाही. यामुळे रस आणि बर्फ गोळे यातूनच संसर्गजन्य शरीरात प्रवेश करतात आणि मग आपले पाय रुग्णालयाकडे वळविण्याशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. दारूमध्ये जे बर्फाचे चौकोनी आकाराचे तुकडे वापरले जातात ते तुकडे फ्रिजमधील नसून त्याचेही घरगुती कारखाने असून याची नोंद अन्न परवाना विभागाकडे नाही.

उन्हात फिरताना एखादा बर्फाचा गोळेवाला दिसला की त्या गोळ्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. थंडगार बर्फाच्या मोहात पडून आपण त्याच्याकडे वळतो. एका बर्फाच्या गोळ्यापासून झालेली सुरुवात तीन ते चार बर्फाचे गोळे खाऊनच आपली तृष्णा भागते. तसेच रस्त्यावरून जाताना कुठे तहान लागली आणि समोर सरबताची गाडी दिसली की आपण तिकडे वळतो अन् सरबत पितो. पूर्ण अंगभर घामाच्या धारा वाहत असताना बर्फाकडे कोण आकर्षित होणार नाही.

बर्फ उत्पादन करणार्‍या कारखान्यात काही ठिकाणी दर्शनी भागातच ‘अखाद्य बर्फ’ म्हणून उल्लेख केलेला आहे. मग तो बर्फ तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जाते ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तसेच बर्फ मोठय़ा आकाराचा व्हावा व तो फार काळ टिकावा, यासाठी त्यावर मोठय़ा प्रमाणावर अमोनियमचा वापर केला जातो. त्याच्या जोडीला विविध वायूंचा वापर यामध्ये होत असतो. हे सर्व वायू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात.

तपासणी करण्याऐवजी प्रशासन घेतेय केवळ बघ्याची भूमिका
बर्फातील पाण्याचे नमुने नेहमी तपासणे गरजेचे असताना अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग नियमित तपासणी करीत नाही. तसेच काही बर्फ कारखान्यातील बर्फ तयार करण्याचे लोखंडी डबे खराब झाले आहेत. कारखानदार दर पाच वर्षांनी ते डबे बदलतात, असे त्यांचे मत आहे. मात्र प्रत्यक्षात ते डबे बदलतात का नाही हे तपासणे गरजेचे आहे. कारण डबे लोखंडी असल्यामुळे ते खराब झाल्यास त्यामधील बर्फ खाने धोकादायकच असतो. परंतु याकडेही प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.

विनापरवाना कारखाने
बिअर, वाइन, शीतपेय आदीमध्ये जे बर्फाचे खडे वापरले जातात ते उत्पादित करण्याचे काम घरगुती स्वरूपात चालते. परंतु प्रत्यक्षात त्यासाठी कोणाचीच परवानगी घेतली जात नाही. अन्न व भेसळ प्रतिबंधक संहितेनुसार सेवन केल्या जाणार्‍या प्रत्येक पदार्थांसाठी परवानगी घेणे अपेक्षित आहे. शहरात भय्या चौक, शास्त्रीनगर आदी भागात घरगुती स्वरूपात हे बर्फाचे खडे बनविण्याचे काम चालते. त्याला अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचा कसलाच परवाना नाही. शिवाय हे बर्फाचे खडे तयार करण्यासाठी कुठले पाणी वापरले जाते हे सांगणे अवघड आहे.

दहा जणांकडून बर्फाचे खडे तयार करून केली जाते विक्री

बर्फाचे खडे तयार करणारी मशीन सोलापुरात सुमारे दहाजणांकडे आहेत. एका मशीनद्वारे दररोज तीन घागर पाणी वापरून बर्फाच्या खड्याच्या नऊ पिशव्या तयार केल्या जातात. एका पिशवीमध्ये पाच किलो बर्फाचे तुकडे असतात. हे तुकडे सात रुपये किलोप्रमाणे विकले जातात. मशीन वापरणार्‍यांचे वीज बिल दरमहा आठ ते दहा हजार रुपये येते. उत्पन्न केवळ आठ ते नऊ हजार रुपये होते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असा कोणीच व्यवसाय करू शकणार नाही. मशीन वापरणार्‍या अधिकांश मालकांकडे फक्त शॉप अँक्ट परवाना आहे. अन्न व भेसळ विभागाचा परवाना नाही. जेव्हा कॉलराची साथ पसरली होती त्यावेळी प्रशासनाकडून या व्यावसायिकांची पाहणी तसेच पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर एकदाही अधिकारी फिरकले नाहीत.

..असा होतोय बर्फाचा वापर
ज्या बर्फाचे गोळे करून ते विकले जातात त्या बर्फाचा मूळ वापर रुग्णालयांमध्ये औषधांचा अथवा सलाइनचा साठा करण्यासाठी होतो. तर मच्छीमार याचा वापर मासे ताजे राहण्यासाठी करतात. बर्फाचा सर्वाधिक वापर हा रासायनिक उत्पादने तयार करणार्‍या कंपन्यांमध्ये होतो. हाच बर्फ आपण आपली तहान भागविण्यासाठी वापरतो.

बर्फाची एक लादी 400 ते 500 रुपयांना विकली जाते. प्रत्येक बर्फ कारखान्यातील बर्फाचे वेगवेगळे दर आहेत. एका कारखान्यातून दररोज 70 ते 90 लाद्या बर्फ विकला जातो. यासाठी दररोज दहा ते बारा हजार लिटर पाणी वापरले जाते. पाणी भरून ठेवल्यानंतर तीन दिवसांनंतर बर्फ तयार होतो. उन्हाळ्यामध्ये बर्फाला मागणी जास्त असते. ती 30 ते 40 टक्क्यांनी वाढते.

आरोग्याकडे दुर्लक्ष
बर्फ कारखान्यामधील कर्मचार्‍यांनी हॅन्डग्लोज वापरणे बंधनकारक आहे. तसेच दर तीन महिन्यांनून त्यांच्या आरोग्याची तपासणी होणे अत्यावश्यक आहे. मात्र असे चित्र बर्फ कारखान्यात दिसून येत नाही. याची पाहणी महापालिकेमार्फत होणे अनिवार्य असताना अशी झालेली पाहणी दिसून येत नाही.

बर्फ उत्पादक 6 कारखाने

होटगी रोड : एक
अक्कलकोट रोड एमआयडीसी : पाच
बंद अवस्थेत : एक
काही ठिकाणी बर्फ कारखान्यासमोर ‘अखाद्य बर्फ’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तरीही बर्फ नेण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होत असते.
बर्फ खाण्यासाठी विकणे चुकीचे
अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
बर्फ खाणे आरोग्याच्या दृष्टीने पडते महागात
बर्फ कारखान्यातील पाण्याचे नमुने नियमित तपासणे गरजेचे

अखाद्य म्हणून विकतो
आम्ही आमच्या कारखान्या-समोर अखाद्य बर्फ म्हणून उल्लेख करतो, तरीही बर्फ घेऊन जाणारे सेवन केले जाणार्‍या पदार्थांसाठी त्याचा वापर करतात. खाण्यासाठी बर्फ घेऊन जाणार्‍यांची संख्या फक्त दहा टक्के आहे आणि इतर कारणासाठी बर्फ वापरणार्‍यांची संख्या 90 टक्के आहे.’’ मोहन नागदेव, कारखानदार

माहिती घेऊन कारवाई
बर्फ कारखान्यांना जे परवाने दिले आहेत, ते महापालिकेने दिले आहेत. नव्याने कायद्यामध्ये बदल झाला आहे. या पदावर आपण नव्यानेच काम पाहत आहे. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू.’’ टी. एस. बोराळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न व भेसळ विभाग

नक्कीच कारवाई करू
बर्फ कारखानदारांना परवाना देतानाच सर्व नियम आखून दिलेले आहेत. त्यामध्ये जर कुठल्या त्रुटी आढळून आल्या तर त्यांच्यावर 376 (5) नुसार नोटीस काढायला पाहिजे. मी या पदावर आठ दिवसांकरता आलो आहे. त्यामुळे काही सांगणे अवघड आहे. तरीही जर कुणी चुका करीत असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करेन.’’ एस. व्ही. कोळकुर, प्रभारी अन्न परवाना अधीक्षक, महापालिका