आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक गणनेचा मुहूर्त नोव्हेंबरमध्ये जुळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्र शासनाच्या वतीने 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर कालावधीत शहर-जिल्ह्यातील भाजीविक्रेत्यांपासून ते विदेशात माल निर्यात करणार्‍या कारखानदारांची आर्थिक गणना करण्यात येणार आहे. बैठकीत गणनेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात कामास सुरुवात होण्यास नोव्हेंबर महिना उजाडणार आहे.

जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी सीईओ तुकाराम कासार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी पी.व्ही. गोडसे आदी उपस्थित होते. आर्थिक गणनेसाठी जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील.गणनेच्या कामासाठी तहसीलदारांनी प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नेमणुकीचे आदेश देण्यात आले.प्रगणक व पर्यवेक्षकांना 17 ते 31 ऑक्टोबर कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे,असे गेडाम यांनी सांगितले.

बैठकीत घेतला आढावा
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी आर्थिक गणनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातच बैठक घेतली. उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे सीइओ,तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तलाठी, ग्रामसेवकांवर भार
प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून प्रत्येक गावातील तलाठी व ग्रामसेवकांची निवड करण्यात आली आहे. यामुळे आर्थिक गणनेत तलाठी व ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रशिक्षण 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार असल्याने प्रत्यक्ष गणनेच्या कामास नोव्हेंबर महिनाच उजाडणार आहे.