आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजूंना शिक्षणासाठी पंधरा लाखांपर्यंत कर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मातंग समाजातील गरजू मुलांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, यासाठी अण्णा भाऊ साठे महामंडळाकडून 1 ते 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने 350 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी दिली.

मातंग समाजातील पात्र लाभार्थ्यांना महामंडळाकडून कर्जमंजुरीसाठी वारंवार मागणी करूनही कर्ज मिळत नव्हते. पदभार घेतल्यापासून महामंडळासाठी भरीव निधी खेचून आणला आहे. मागील वर्षी 75 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी 25 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षासाठी 300 कोटी व मागील 50 कोटी असे 350 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

दलालांमार्फत कर्ज दिल्यास कारवाई
कर्ज प्रकरणाचे पश्चिम महाराष्ट्रातून कमी प्रस्ताव आहेत, तर मराठवाड्यात अधिक मागणी आहे. मागणीनुसार व पात्र लाभार्थ्यांना कर्जे देण्याच्या अधिकार्‍यांना सूचना दिलेली असून दलाल व एजंटामार्फत कज्रे दिले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी 80 टक्के कर्ज प्रकरणे ही बोगस झाल्यामुळे राज्यात 13 जणांवर कारवाई केल्याचे कदम म्हणाले.

कर्ज वसुली 25 टक्के
प्रशिक्षणाच्या नावाखाली 17 कोटी खर्च झाले, पण पात्र तरुणांना संधी मिळाली नाही. भविष्यकाळात महामंडळाकडून मातंग समाजाच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. महामंडळाच्या कर्जाची वसुली 3 टक्के होती, आता 25 टक्क्यांवर आली आहे. उपलब्ध निधीतून महिलांसाठी 100 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. शासनाने इतर सर्व महामंडळाची 1,149 कोटी रुपयांची थकबाकी माफ केली, अण्णा भाऊ साठे महामंडळाची 121 कोटी रुपयांची थकबाकी माफ केली नसल्याने कदम यांनी नाराजी व्यक्त केली.

सोलापुरातून प्रस्ताव नाही
महामंडळास प्रथम मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. सोलापुरातून कर्जासाठी एकही प्रस्ताव आलेला नाही. लॉटरी पद्धतीने कर्ज वितरण केल्यास पात्र व गरजू लाभार्थी या योजनेपासून दूर राहण्याचा धोका आहे, यामुळे ही पद्धत बंद करावी, असे मतही महामंडळाचे अध्यक्ष कदम यांनी व्यक्त केले.