आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती लाटणाऱ्या 'मुन्नाभाईं'चे 'गुरू' कोण...?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजातील वंचितांसाठीच्या योजनांमधील निधीतील भ्रष्टाचार हा गंभीर स्वरूपाचा सामाजिक गुन्हा आहे. शिष्यवृत्ती योजनेतील घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीतील तथ्यानुसार नोंदवलेल्या सव्वा कोटीच्या गुन्ह्याची शाई वाळत नाही, तोपर्यंतच समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी हा आकडा २८ कोटीपर्यंत गेल्याचे सूतोवाच केले आहे. शासन तिजोरी लुटणाऱ्या 'मुन्नाभाईं'नी 'गुरू दक्षिणा' कोणापर्यंत पोहोचवली, हे शोधण्याचे कसब पोलिस यंत्रणेसमोर आहे.

सोलापूरच्या सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्ती घोटाळ्यासाठी वापरलेली पद्धत यापूर्वी २००८ मध्ये सोलापूर जिल्हा कोशागार कार्यालयात वापरलेली होती. कोशागार कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात हात पोळून घेतले होते. तरीही पुन्हा त्याच पध्दतीने समाजकल्याण खात्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा समोर आला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते लिपिकापर्यंतचा अंमलबजावणी यंत्रणेवर अंकुश नसल्याचे समोर येते, किंबहुना दुसरा अर्थ हितसंबंध जपणे असा तरी निघू शकतो. कोशागार कार्यालयातील घोटाळा बँकेच्या तत्परतेने समोर आला होता. शिष्यवृत्ती घोटाळ्याची फिर्याद सव्वा कोटीची अन् आकडा २८ कोटींचा कसा झाला, पोलिसांनी तातडीने रेकॉर्डवर हा आकडा घेतल्यास आरोपींना जामिनाची संधी मिळू शकते.

निधीची मागणी केली कशी?
लिस्टवर असतात अधिकाऱ्यांच्या सह्या तर नावे कशी घुसडली.
तर शासनाकडून निधी मागवताना विद्यार्थ्यांना देय असलेल्या रकमेचा ताळेबंद कसा लागत होता.
एजन्सीची कर्मचारी मुलगी बँकेला याद्या पाठविताना नावात फेरफार करत होती.
प्रत्यक्ष मागणी वितरण याचे विनियोग प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयांना ताळमेळ घेताच कसे पाठवले जात होते, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

वाघमारेला माहिती मागवल्याचे समजले कसे ?
पांडुरंगवाघमारे यांच्या नावावर बँक खात्यात पैसे कसे आले? अशा आशयाचा माहिती अधिकारातून अर्ज समाजकल्याण कार्यालयात १३ मार्च २०१५ आकाश तुपसमिंदर यांनी दिला होता. दरम्यान, दोन-तीन दिवसांत वाघमारे यांनी कार्यालयात येऊन वैयक्तिक माहिती देऊ नये, असा अर्ज कसा दिला. त्याला माहिती मागवल्याचे कोणी सांगितले. माहिती अधिकाराचा अर्ज कार्यालयातील माहिती अधिकारीच स्वीकारतात. त्यामुळे घोटाळ्याचे बिंग फुटू नये याची काळजी घेतल्याचे वरकरणी दिसते आहे. पोलिसांना याबाबी तपासात घ्याव्या लागतील.
पांडुरंग वाघमारे - इंजिनिअरिंगचा 'मुन्नाभाई'
पांडुरंगवाघमारे याने २००३ मध्ये १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. २०११-१२ मध्ये त्याने वैराग भागातील एका इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी म्हणून शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज केलेला आहे. विशेष म्हणजे संबंधित कॉलेजच्या यादीत इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला त्याचा प्रवेश असल्याचा उल्लेख आहे. त्यानुसार त्यास ५४ हजार ५० रुपये शिष्यवृत्ती मोहोळच्या युनियन बँकेतील पांडुरंग वाघमारे यांच्या खात्यात वितरीत झाली असल्याचे सांगितले जाते. असे किती 'मुन्नाभाई' आणि शिक्षण संस्थांमध्ये रेकॉर्डवर नाव दाखवणारे गुरुजी शोधणे महत्त्वाचे आहे.