आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेलाची पाने बनली ‘त्याच्या’ शिक्षणाचा आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बेलाच्या पानांना श्रावणात धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. पूजाविधीत मानाचे स्थान असलेल्या बेलाच्या पानांनी योगिनाथ रामय्या स्वामी (रा. रोहिणीनगर, विजापूर रोड) याला शिक्षणासाठी आधार दिला आहे. जागृती विद्यामंदिरात अकरावीत शिकणारा योगिनाथ गेल्या पाच वर्षांपासून श्रावण महिन्यात घरोघरी जाऊन बेलपत्री वाटतो आणि त्यातून मिळणार्‍या पैशांतून शिक्षणाचा खर्च भागवत आहे.
सैफुल परिसरातील कित्तूर चन्नम्मा, नरेंद्र, स्वामी विवेकानंद, अनुपम पार्क, वैष्णवी नगर, रूबी नगर, इंडियन मॉडेल स्कूल या भागातील 115 घरांत दररोज तो बेलाची पाने वाटतो. दुपारी दोन ते सायंकाळी सहापर्यंत त्याचे हे काम चालते. एका घरामागे शंभर रुपये याप्रमाणे त्याला महिनाभरात जवळपास पाच हजार रुपये मिळतात.
बेलाच्या पानांसाठी कसरत
बेलाच्या झाडांची संख्या अत्यल्प असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वीच शोध घ्यावा लागतो. झाड शोधल्यानंतर महिनाभर पाने घेण्यासाठी त्या झाडाच्या मालकाला ठरावीक रक्कम द्यावी लागते. यंदा टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील झाडाची पाने योगिनाथ आणत आहे. दर दोन दिवसांनी त्याला टाकळीला जावे लागते. बेलाच्या काटेरी झाडावर चढून पाने काढावी लागतात. ही पाने सोलापूरला आणून खाडे न करता घरोघरी वाटप करण्याची कसरत त्याला करावी लागते.
पोलिस दलात भरती व्हायचे आहे
बेलाची पाने वाटताना सुरुवातीला अडचणी आल्या, पण आता अनुभवाने हे काम जमू लागले आहे. सत्यनारायण पूजा, वास्तुशांती यासारखे धार्मिक विधी करण्याचे शिक्षणही तो घेत आहे.भविष्यात पोलिस दलात जाण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो आतापासून तयारी करत आहे.