आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे १० उमेदवार शेतकरी; चाकोते सिनिअर तर खरात ज्युनिअर. प्रणिती शिंदे उच्चशिक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देशातील सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने जिल्ह्यातील ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. अनेक उद्योग असलेल्या उमेदवारांनी मात्र शपथपत्रामध्ये मुख्य व्यवसाय शेती असल्याचे सांगत पत्नी घरकाम करीत असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री प्रणिती शिंदे, दिलीप माने, भारत भालके यांच्यासह १० उमेदवारांनी मुख्य व्यवसाय शेतीच असल्याचे नमूद केले आहे.

काँग्रेसचे तीन उमेदवार वगळता इतर उमेदवारांचे शिक्षण जेमतेमच असल्याचे दिसते. पहिल्यांदाच संधी मिळालेले कल्याण काळे यांचे दहावी तर गौरव खरात यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचे शिक्षण बारावी तर जयवंतराव जगताप यांचे शिक्षण फक्त नववी झाल्याचे शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार दिलीप माने जगदीश बाबर यांच्याकडे बीएची पदवी आहे. बार्शीचे उमेदवार सुधीर गाढवे यांच्याकडे विद्युत अभियांत्रिकीची पदवी असून ते याच व्यवसायात आहेत. विद्यमान आमदार भारत भालके हे दहावी नापास तर शिक्षकी पेशा असलेले मार्तंड साठे यांचे एम.ए. बीएड पर्यंत शिक्षण झाले आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११ उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये मोहोळमधून ३० वर्षीय गौरव खरात, सांगोल्यातून ५० वर्षीय जगदीश बाबर, माळशिरसमधून ४५ वर्षीय मार्तंडे साठे, माढा येथून ४१ वर्षीय कल्याण काळे यांना काँग्रेसने पहिल्यांदाच संधी दिली आहे. वयाने समकक्ष असलेले विश्वनाथ चाकोते, जयवंतराव जगताप, दिलीप माने यांनाही पुन्हा संधी देण्यात आली. वयाने सिनिअर असलेले विश्वनाथ चाकोते तरुण महिला म्हणून शहर मध्यमधून प्रणिती शिंदे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

उत्तरमधील विश्वनाथ चाकोते हे सर्वाधिक वयाचे उमेदवार आहेत तर माेहोळमधील गौरव खरात हे सर्वात कमी ३० वर्षे वयाचे उमेदवार आहेत. दिलीप माने, भारत भालके, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे समकक्ष वयाचे ५४ वर्षे वयाचे उमेदवार आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांचे सरासरी वय ४३ वर्षे आहे.

जिल्ह्याच्या ११ उमेदवारांमध्ये आमदार प्रणिती शिंदे या उच्चशिक्षित असल्याचे दिसते. आमदार शिंदे यांच्याकडे एलएलबीची पदवी असून त्यांचे शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले आहे. सर्वात कमी शिक्षण माजी जयवंतराव जगताप यांचे नववी तर विद्यमान आमदार भारत भालके हे दहावी नापास आहेत.