आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission News In Marathi, Central Excise Export Stop Issue At Solapur

50 कोटी रुपयांची निर्यात झाली ठप्प, अधिकारी निवडणूक कामात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्रीय अबकारी खात्याच्या (सेंट्रल एक्साइज) तपासणीअभावी निर्यातीचा माल गेल्या काही दिवसांपासून उत्पादनस्थळीच पडून आहे. ही तपासणी त्वरित होण्यासाठी निर्यातदारांनी गुरुवारी खात्याच्या उपायुक्त प्रकृती निगम यांची भेट घेतली. पण निगम यांनी हात जोडून ‘मी काय करावे?’ असा प्रतिप्रश्न केला. ‘सगळे अधिकारी निवडणूक कामाला लागले. त्यामुळे 16 एप्रिलपर्यंत थांबा!’ असा सल्लाही त्यांनी दिला. त्यावर संतापलेल्या निर्यातदारांशी शाब्दिक चकमक झडली. बालाजी अमाइन्सचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी कार्यालयासमोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला. त्यावरही निगम गंभीर झाल्या नाहीत.
निर्यात होणार्‍या मालाची कागदपत्रांनुसार तपासणी करणे आणि कंटेनर सील करण्याचे काम केंद्रीय अबकारी खात्याचे आहे. होटगी रस्तालगतच्या जिल्हा उद्योग केंद्रसमोर त्याचे कार्यालय असून, अधीक्षक दर्जाचे अधिकारी निर्यातीच्या मालाची तपासणी करतात. परंतु सर्व अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतले. त्यामुळे मालाची तपासणी करणारी यंत्रणाच नाही. ‘पर्यायी व्यवस्था करा, जिल्हाधिकार्‍यांना सांगा’, असा आग्रह निर्यातदारांनी धरला. परंतु निगम यांनी त्यांच्यासमोर हात जोडले. त्यासाठी निर्यातदारांना जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घ्यावी लागली.

या वेळी एमआयडीसी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष तिलोकचंद कांसवा, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, लघुउद्योग संघटनेचे सचिव हरिगोडबोले, टॉवेल निर्यातदार चंद्रय्या इराबत्ती, बंग डेटा फर्मचे संचालक वासुदेव बंग आदी उपस्थित होते.

मुंबईत निरीक्षकच..
मुंबईसारख्या ठिकाणी अबकारी खात्याचे निरीक्षक निर्यात मालाची तपासणी करून कंटेनर सील करत आहेत. ही बाब आम्ही मॅडमच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, त्या ऐकायलाच तयार नाहीत. तशी पर्यायी व्यवस्था करून दिली तरी आमचा प्रश्न सुटेल. अन्यथा माल तसाच ठेवल्यास आमचे प्रचंड नुकसान होईल.’’ डी. राम रेड्डी, संचालक, बालाजी अमाईन्स

नियंत्रणात नाही
काही कर्मचारी, अधिकारी माझ्या तर अबकारी खात्यासारख्या केंद्रीय कार्यालयातील अधिकारी निवडणूक आयोग अथवा निरीक्षकाच्या नियंत्रणाखाली असतात. त्यांच्या कामाची जबाबदारी आयोगाकडून सोपवलेली असते. त्यामुळे त्यांना कामातून सुटका देण्याचे अधिकार मला नाहीत.’’ डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी

1. दर आठ दिवसांनी निर्यातीचा माल तयार असतो. 20 मार्चपासून उत्पादकांकडे माल तयार आहे. परंतु, अबकारी खात्याची तपासणी करणारी यंत्रणा नाही.
2. शनिवार, रविवारी सुटी. सोमवारी गुढीपाडव्याची सुटी. चौथ्या दिवशी वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी भेटतील. त्यात एक दिवस गेला की, पुढची उत्पादने पुन्हा तयारच होतील. त्याचे काय?

तपासणीला उशीर झाल्यास काय होईल?
1. औषधी रासायनिक घटक पावडर किंवा द्रवरूपात (लिक्वीड) निर्यात केली जाते. विशिष्ट वेळेत त्यावर प्रक्रिया झाली नाही तर त्यावर परिणाम होतो. विशेषत: द्रवरूपातील रसायनांची शुद्धता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती नाकारली (रिजेक्ट) जाऊ शकते. त्याचा मोठा फटका निर्यातदारांना बसतो.
2. निर्यातक्षम टॉवेल, नॅपकीन्सची उत्पादने वेळेत पाठवण्याबाबत करार होता. त्याचे उल्लंघन करण्याने उत्पादने नाकारली जाऊ शकतात अथवा दंड आकारणी होते. त्याचा जबर फटका निर्यातदारांना बसतो. त्यामुळे करारात ठरल्याप्रमाणे उत्पादने पाठवण्यासाठी उत्पादकांची धडपड असते.

अबकारी खात्याच्या उपायुक्त प्रकृती निगम म्हणाल्या, मी काय करावे?
सोलापूरचे निर्यातदार म्हणाले, आम्ही आत्महत्या करायची का?
40 कोटी रुपयांची औषधी रसायने कंटेनर भरून कार्यस्थळी उभे
12 कोटी रुपयांचे नॅपकीन, टॉवेलही निर्यातीच्या प्रतीक्षेत

असा झाला संवाद
निर्यातदार : मॅडम, कंटेनर्स तयार आहेत. सील करून द्या!
निगम : अधिकारी निवडणूक कामात असल्याने ते शक्य नाही.
निर्यातदार : इतरत्र निरीक्षकांच्या सह्यांनी सील होत आहेत.
निगम : निरीक्षकांकडे हे काम देऊन धोका पत्करणार नाही.
निर्यातदार : आपल्या कार्यालयासमोर कंटेनर घेऊन येऊ; मग तर सील करणार का?
निगम : 17 एप्रिलपर्यंत काहीही करू शकत नाही. समजलं?
निर्यातदार : आम्ही आपल्या कार्यालयामसोर आत्महत्या करू.
निगम : (हात जोडत) मी काय करावे?

महसूल वसुली थांबते?
देशाला परकीय चलन मिळवून देणार्‍या निर्यातदारांकडून महसूलही मोठय़ा प्रमाणावर मिळतो. अशा घटकांकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणारे नाही. याचे गांभीर्य वरिष्ठ अधिकार्‍यांना नसावे, याचे आश्चर्य वाटते. महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांची यंत्रणा थांबते का? तशाच पद्धतीने निर्यातदारांचाही विचार करावा.’’ तिलोकचंद कांसवा, टॉवेलचे निर्यातदार