आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये सुरू झाला आता दोस्ती-दुश्मनीचा नवा अध्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सुशीलकुमार शिंदे यांचे शहरातील राजकीय साम्राज्य सांभाळणारे त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून विष्णुपंत कोठे यांना ओळखले जाते. मात्र, महेश कोठे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता त्यांच्यातील राजकीय वैमनस्याचे पैलू उलगडू लागतील, अशी शक्यता आहे.
‘सलामत रहे दोस्ताना हमारा...’ असे विष्णुपंत कोठे यांनी म्हटले असले तरी ‘शहर मध्य’मध्येच महेश कोठे हे प्रणिती शिंदे यांना आव्हान देणार असल्याने ही दोस्ती आता कशा स्वरूपाची असेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुशीलकुमार शिंदे राज्यात परिवहन खात्याचे राज्यमंत्री असताना 197८-79 च्या सुमारास विष्णुपंत कोठे आणि शिंदे यांची जवळीक निर्माण झाली. शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचा कारभार कोठे यांच्याकडे आला. तेथून 2004 पर्यंत त्यांच्यात घनिष्ठ जवळीक होती. शिंदे यांची सोलापुरातील सर्व राजकीय सूत्रे कोठे यांच्याच हाती होती. त्यामुळेच महापालिकेची सूत्रेही कोठेंनीच सांभाळली, ती आजपर्यंत त्यांच्याकडेच आहेत.

2004 नंतर त्यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले. शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत 2009 मध्ये तिकीट मिळूनही महेश कोठेंना जिंकता आले नाही. तेथूनच त्यांची राजकीय अस्वस्थता वाढत गेली. आता या विधानसभा निवडणुकीत आपण जिंकलो नाही तर कधीच नाही, असा विचार महेश कोठे यांनी केला आहे. विष्णुपंत कोठे यांना गेल्या 30-35 वर्षांत काम करूनही आमदारकी मिळाली नाही याचा रागही त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसलाच तेही सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्येलाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला. ते आता शिवसेनेकडून ‘शहर मध्य’मधून लढणार असल्याची चर्चा आहे. विष्णुपंत कोठे यांनी ही दोस्ती कायम राहील असे म्हटले असले तरी हा ‘दोस्ताना’ आता किती काळ राहील याबाबत शंकाच आहे.

अनेकांना आनंद
काँग्रेस पक्षात कोठे यांच्या जाण्याने पालिका सत्तेपासून दूर असलेल्या अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे, तर काहीजण शहर मध्यमध्ये मतविभागणीचा धोका असल्याचे सावधपणे सांगत आहेत. महापालिकेत कोठे यांनी एकहाती वर्चस्व ठेवले होते, त्यामुळे पक्षातून अनेक नेते नाराज होते. ते आता पुन्हा सक्रिय होतील.

प्रणिती यांना आव्हान
कोठे यांना मानणारे नगरसेवक शहर मध्यमधेही आहेत. पद्मशाली समाजाची मते कोठे आणि नरसय्या आडम यांच्यात विभागण्याची शक्यता असली तरी काँग्रेसची ताकद विभागली जाईल. पक्षातील बंड थोपवणे आणि लोकसभेला झालेली पिछेहाट भरून काढणे या दोन्ही बाजूने लढण्याचे आव्हान आहे.

सेनेला मिळाले बळ
महेश कोठे यांच्यासोबत सध्या नगरसेवक उघडपणे गेलेले नसलेतरी काँग्रेसमधील सात ते आठ नगरसेवक छुप्या पद्धतीने का होईना शिवसेनेसोबत असतील. त्यामुळे शिवसेनेला आयते बळ मिळाले.

चाकोतेंचा मार्ग मोकळा
कोठे हे सेनेकडून शहर मध्यमधून लढणार. आता शहर उत्तर मतदारसंघ काँग्रेसमधील इच्छुकांसाठी मोकळा झाला. माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दायमा इच्छुक आहेतच. पण चाकोते यांचे पारडे सध्या पक्षात तरी जड झाले आहे.