आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेच्या माध्यमातून माकपची निवडणूक तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. शहर मध्य विधानसभा मतदार संघातून नरसय्या आडम यांना रिंगणात उतरवण्याचीच ही पूर्वतयारी असल्याचे तेथील भाषणांवरून स्पष्ट झाले.
शहर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे संभाव्य उमेदवार महेश कोठे यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा खरपूस समाचार या कार्यशाळेच्या माध्यमातून घेतला गेला. सकाळी 11 वाजता अ‍ॅचिव्हर्स मल्टिपर्पज हॉल येथे ही कार्यशाळा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदारांनी प्रलोभनाला बळी पडू नये. प्रत्येक घरात ‘आडम’ तयार करा, असे आवाहन माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मला लालबावट्याचा ‘शेर’ आहे असे संबोधले होते. त्यासाठी यंदा आमदार होताच शहरातील सर्व अवैध व्यवसाय आणि गैरकारभार बंद पाडू, पोलिसांचे हप्ते बंद करू आणि शिस्त लावू, असे आश्वासन आडम यांनी दिले.
कोणाला ‘कोठे’ जायचे जाऊ द्या, ‘मध्य’मध्ये लालबावटाच विजयी होणार, असे म्हणत शिवसेनेत प्रवेश केलेल्या महेश कोठे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख आडम यांनी केला.
पूर्वी आडम यांना कॉँग्रेसवाल्यांनी मोठी ऑफर दिली होती. मास्तरांनी ती नाकारली. परंतु, शिंदे यांच्या छत्रछायेखाली ज्यांनी अमाप संपत्ती जमा केली आणि आता शिवसेनेत प्रवेश करताहेत त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन श्री. ढवळे यांनी केले. प. बंगालचे माजी खासदार निलोत्पल बसू यांनीही आडम यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक एम. एच. शेख यांनी केले.सूत्रसंचालन अनिल वासम, आभार माशप्पा विटे यांनी मानले.

सुशीलकुमार शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव : डॉ. ढवळे
सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेत कधीही कामगारांचे प्रश्न मांडले नाहीत. त्यांच्यासाठी एकही योजना आणली नाही. म्हणूनच कामगारांनी त्यांना पाडले. अल्पसंख्याक गृहनिर्माण योजनेच्या फाइलवर स्वाक्षरी होऊ नये म्हणून सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेला आमदार प्रणिती शिंदेंचे डिपॉझिट जप्त व्हायला हवे असे काम करा, असे आवाहन माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी केले.