आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम विधानसभेची - तीन मतदारसंघांची तयारी पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर मध्य, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर या तीन विधानसभा मतदारसंघांची निवडणूकपर्व तयारी पूर्ण झाली आहे. या तीन मतदारसंघातील ७९६ मतदान केंद्रांवर राखीव कर्मचाऱ्यांसह ६ हजार १२९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शहर मध्यचे निवडणूक अधिकारी शहाजी पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेस निवडणूक अधिकारी श्रीमंत पाटोळे, रवींद्र कुलकर्णी, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे आदी उपस्थित होते.

राखीव मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसाठी अनामत रक्कम ५ हजार रुपये आहे तर खुल्या प्रवर्गातून जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याऱ्या उमेदवारांना १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. शिवाय राष्ट्रीय पक्षासह मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारास १ सूचक द्यावा लागणार आहे तर अपक्ष उमेदवारांना १० सूचक द्यावे लागणार आहेत. अर्ज दाखल करताना निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फक्त
५ व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पूर्ण पालन होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आचारसंहिता भंगची तक्रार येथे करा
शहरातील तीन मतदारसंघातील आचारसंहिता भंगाची तक्रार वा निवडणूकविषयक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. शहर मध्य मतदारसंघासाठी २७३१०१४, शहर उत्तर मतदारसंघासाठी २७३१०२० व शहर दक्षिण सोलापूरसाठी २६२२८९९ हे क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.

२००९ च्या निवडणुकीत २४ गुन्हे
मागील २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तीन मतदारसंघाच्या क्षेत्रात एकूण २४ गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये १४ आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी होते. १० इतर प्रकारचे गुन्हे होते. शहर उत्तर मतदारसंघामध्ये १३, शहर मध्य मतदारसंघात ९ तर दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये २ गुन्हे दाखल झाले होते.
लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १३ गुन्हे दाखल झाल्याची माहिती आयुक्त प्रदीप रासकर यांनी दिली. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेचे िनयोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीसाठी सुमारे पाच कोटी
जिल्ह्यातील ११ विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ९५ लाख रुपये निवडणूक कार्यालयास मिळाले आहेत. एका मतदारसंघासाठी ४५ लाखप्रमाणे ही रक्कम मिळाली. ३५ लाख रुपये तातडीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये एसटी व वाहन भाडे, डिझेल खर्च, स्टेशनरी, कर्मचारी भत्ते देण्यात येणार आहेत. एरव्ही दीड ते दोन महिना चालणारी निवडणूक प्रक्रिया यंदा एका महिन्यात पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगाने निधी उपलब्ध करून दिला असला तरी यामध्ये केंद्र ५० टक्के व राज्य ५० टक्के यांचा वाटा असतो.