आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात दीड लाख मतदारांचा हिरावला जाणार हक्क; पुन्हा मतदार नोंदणी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसल्याने शहरातील मतदारांचा हक्क हिरावला जाणार आहे. ही संख्या थोडीथोडकी नसून तब्बल एक लाख 63 हजार 965 आहे. ही नावे यादीतून वगळण्याची शक्यता आहे. त्याला मतदातेही जबाबदार असून ओळखपत्र काढून घेण्याबाबत ते उदासीन असल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे.

दरम्यान, ओळखपत्र मिळवण्याची संधी अजून संपलेली नाही. त्यासाठी प्रभागांमध्ये मंगळवारी मतदार यादीतील नावांचे वाचन होणार आहे. तेथे मतदारांनी नगरसेवकांमार्फत संपर्क करून खात्री करून घ्यावयाची आहे. सकाळी 11 वाजता हे कामकाज सुरू होईल. ते दिवसभर चालेल. शहरात शहर उत्तर, शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने सर्वच निवडणुकांसाठी ओळखपत्र सक्तीचे केले आहे. जिल्हा प्रशासनाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा शेवटचा टप्पा सध्या सुरू आहे. एका मतदाराचे नाव अनेक ठिकाणी असणे, पत्ता बदल, पत्ता न सापडणे आदी कारणाने ओळखपत्रे नसल्याची आहेत. पहिल्या टप्प्यात शहर उत्तरमध्ये 91 हजार 594, शहर मध्यमध्ये एक लाख दोन हजार तर दक्षिण सोलापूर मतदार संघात 83 हजार 934 मतदारांकडे ओळखपत्रे नसल्याचे आढळून आले होते.

काहींच्या ओळखपत्रावर छायाचित्रे नाहीत. ते घेऊन ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे. केवळ 58 हजार 805 मतदारांची छायाचित्रे उपलब्ध झाली. त्याचा शेवटचा टप्पा येत्या 8 ऑगस्ट रोजी संपणार आहे. छायाचित्रे तहसील कार्यालय किंवा आपापल्या परिसरातील मतदान केंद्रावर सादर करावयाचे आहे. पुन्हा मतदार नोंदणीची प्रक्रिया 16 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ती डिसेंबरपर्यंत जारी राहील.

शहरातील 51 प्रभागांतून सार्वजनिक ठिकाणी यादीचे वाचन केले जाणार आहे. महसूल प्रशासनाचे दोन, महापालिकेचे दोन कर्मचारी व नगरसेवक उपस्थित राहतील. मतदान केंद्रावर याद्या लावल्या आहेत. मतदारांनी नगरसेवकांशी संपर्क साधावा.
-अंजली मरोड, तहसीलदार, उत्तर सोलापूर

प्रत्येक वॉर्डातील स्वच्छता कार्यालयात वाचन होणार आहे. या संदर्भातील कार्यवाही महसूल विभाग करणार आहे. आमचे सहकार्य त्यांना राहील.
- पंकज जावळे, उपायुक्त, महापालिका

मतदारांची उदासीनता
दोन महिन्यांपासून मोहीम सुरू आहे. या काळात शहर मध्यमधून केवळ 19 हजार 519, शहर उत्तरमधून 18 हजार 594 व दक्षिण सोलापूरमधून 20 हजार 692 मतदारांनी छायाचित्रे दिली. या मोहिमेकडे मतदारांनी दुर्लक्ष केले आहे. राजकीय पक्ष, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचेही दुर्लक्ष झाले आहे.

नावे वगळण्याची शक्यता असलेले शहर मध्य विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 70 हजार 816 मतदार आहेत. त्याखालोखाल शहर उत्तरमध्ये 57 हजार 882 आहेत. दक्षिण सोलापूर (जुळे सोलापूर व मनपा क्षेत्रासह) 35 हजार 267 मतदार आहेत.