आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक कामामध्ये दिरंगाई झाल्यास गुन्हे दाखल करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - निवडणूक कामात दिरंगाई करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना नोटिसा देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. सोळाव्या लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय तयारी जोरात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेऊन निवडणूक कालावधीत काम करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात डॉ. गेडाम यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व तालुकास्तरावरील कर्मचार्‍यांची आढावा बैठक घेतली. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मतदार यादीमध्ये 18 वर्षांवरील सर्वांची नोंद झाली आहे किंवा नाही यासाठी सर्व गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी गावनिहाय ग्रामसभा घेऊन मतदार नोंदणीचे आवाहन करावे, अशा सूचना केल्या.

पोस्टल मतदान 100 टक्के करा
जिल्ह्याच्या संकेतस्थळावर निवडणूक लिंक देऊन त्या माध्यमातून निवडणूक विषयीची सर्व प्रसिद्धीपत्रके, मतदार याद्या, वगळलेली व नव्याने नोंद झालेली मतदारांची नावे, परिपत्रके लोड करावीत. यासंबंधीची अधिकाधिक मतदारांनी माहिती मिळेल. निवडणूक नियुक्त अधिकारी कर्मचार्‍यांनी पोस्टल मतदानाद्वारे 100 टक्के मतदान करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश असून त्याचे अधिकार्‍यांनी पालन करावे.

पेड न्यूजचा अहवाल द्या
एमसीएमसी कमिटीच्या नोडल अधिकार्‍यांनी पेड न्यूज आढळून आल्यास तसे जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून तसा अहवाल शासनास द्यावा. निवडणुकीवर बहिष्कार टाकणार्‍या गावांना त्यापासून परावृत्त करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी दिले.

मतदानासाठी फोटो ओळखपत्र बंधनकारकच..
मतदान करणार्‍या प्रत्येक मतदारांकडे फोटो ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे निवडणूक फोटो ओळखपत्र नाही, त्यांच्याकडे आठ क्रमांकाचा अर्ज असणे आवश्यक आहे. मतदार यादीतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, त्यांच्याकडील निवडणूक ओळखपत्रही रद्द केले जाणार आहे.

ज्याच्यासमोर गुन्हा, त्याने करावा तो दाखल
सर्व तालुक्यांतील तहसीलदारांनी प्रयत्नपूर्वक फोटो निवडणूक ओळखपत्राचे 100 टक्के काम करावे. आचारसंहिता भंग होताना ज्याच्या नजरेसमोर हे घडले असेल त्यानेच याबाबत गुन्हे दाखल करावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी या वेळी अधिकार्‍यांना दिल्या.