आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात वीजनिर्मितीत एनटीपीसी आहे आघाडीव- नरेंद्र राय यांनी माहिती दिली.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर- देशातील वीजनिर्मितीमध्ये राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्प (एनटीपीसी) आघाडीवर आहे. सध्या 42 हजार 454 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. सोलापूरजवळच्या फताटेवाडी येथील प्रकल्पाचे काम गतीने होत आहे. त्यामुळे 31 मार्च 2016 पासून प्रत्यक्षात वीजनिर्मितीला सुरुवात होईल, अशी माहिती सोलापूर प्रकल्पाचे महाव्यवस्थापक नरेंद्र राय यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच देशातील एनटीपीसी प्रकल्पांतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट व्यवस्थापनाचा सुवर्णशक्ती पुरस्कार सोलापूरच्या प्रकल्पाला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे उभारत असलेल्या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाच्या स्थितीची माहिती शुक्रवारी दिली. राय म्हणाले, देशात एनटीपीसी प्रकल्पाची सुरुवात 1975 मध्ये झाली. आज देशात 24 प्रकल्प असून 17 कोळसा केंद्रे आहेत. सध्या 42 हजार 454 मेगावॅट वीजनिर्मिती आम्ही करीत आहोत. भविष्यातील 2032 पर्यंतची गरज लक्षात घेता दोन लाख 28 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे कंपनीचे ध्येय आहे. सोलापूरचा प्रकल्प फताटेवाडी, होटगी स्टेशन व आहेरवाडी गावातील 1892 एकर जमिनीवर उभारला जात आहे. 9 हजार 395 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

269 मीटर उंच चिमणी 310 दिवसांत बांधली
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे 269 मीटर उंचीची चिमणी बांधण्यात आली आहे. त्याचे काम विक्रमी 310 दिवसांत पूर्ण झाल्याचे सांगताना राय म्हणाले, चिमणीची उंची पाहता त्यातून बाहेर पडणारी उष्णता व राखेचा कसलाही त्रास पिकांना अथवा लोकांना होणार नाही.

सामाजिक उत्तरदायित्वातून एनटीपीसीने जमिनी दिलेल्या गावांसह सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकत आहे. 233 कोटी रुपये त्यासाठी खर्च होईल. उजनीहून 120 किलोमीटर अंतरावरून पाणी आणत आहोत. पंपहाऊस उभारण्याबरोबर वीजपुरवठय़ासाठी 130 केव्हीची स्वतंत्र लाइन टाकण्यात येत आहे. यामुळे सोलापूरकरांना पाणीपुरवठय़ात अडचणी येणार नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्राला सर्वाधिक वीज मिळेल : सोलापूरचा 1320 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक 65 टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार आहे.