आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरभरती संस्थेमार्फत; संकुलपद्धती होणार बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठातील 38 पदांची भरती त्रयस्थ सरकारी संस्थेमार्फत करण्याचा निर्णय बुधवारी झाला. तसेच, संकुलपद्धती बंद करून विभागनिहाय पद्धती सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या वेळी घेण्यात आला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हे निर्णय झाले. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार अध्यक्षस्थानी होते. एकूण 34 विषयांवर चर्चा झाली.
भरती प्रक्रिया सोपवल्यानंतर उमेदवारांचे अर्ज भरून घेणे, छाननी करणे, पात्र उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेणे, गुणवत्ता यादी लावणे ही कामे संस्था करेल. यावर कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती असेल. यात कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक यांच्यासह व्यवस्थापन परिषदेच्या दोन सदस्यांचा समावेश असणार आहे. नोकरभरतीचे काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
भरती नेहमीच संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून विद्यापीठाने हे पाऊल उचचले आहे. संस्था सशुल्क कार्य करेल. भरतीतील गोंधळ, आरोप, वाद आणि त्याची परिणती न्यायप्रविष्ठ बाब बनते. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी हा पर्याय निवडण्यात आला आहे, असे मत कुलसचिव शिवशरण माळी यांनी व्यक्त केले.
विभागनिहाय शिक्षणपद्धती
सोलापूर विद्यापीठात सध्या सात संकुलांतर्गत सुमारे 35 अभ्यासक्रम कार्यरत आहेत. इतर भाषांबरोबरच उर्दू विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव असेल. संकुलप्रणालीऐवजी अभ्यासक्रमांचे विभागांमध्ये रूपांतरण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी तीन विभाग अनुदानित केले होते. त्यानंतर आणखी दोन विभागांना मान्यता मिळाली असती तर तेव्हाच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) ‘बारा ब’ अंतर्गत शिक्षकेतर अनुदानासाठी मान्यता मिळू शकली असती. मात्र, तत्कालीन कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी पदभार घेतल्यानंतर विभागाचे रूपांतरण संकुल प्रणालीत केले होते. परिणामी विद्यापीठास 12 ब मान्यता मिळण्यासाठी असंख्य अडचणी आल्या. मात्र, डॉ. बंडगर यांच्या संकुलप्रणालीमुळे विद्यापीठ पिछाडीवर पडले होते.
ग्रामीण विकास विषयासाठी नवे केंद्र येणार
विद्यार्थ्यांना ग्रामीण विकास विषयामध्ये संशोधन करता यावे यासाठी सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड फोरसाइट स्टडीज हे केंद्र सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या विषयात संशोधन संधी उपलब्ध होईल.