आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6120 बेरोजगारांना संधी; नीतेश राणे यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्वाभिमान संघटनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात रविवारी सोलापूर शहर व जिल्ह्यातील 6120 बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली. जागेवरच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नीतेश राणे यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या झटपट प्रक्रियेमुळे उपस्थित उमेदवार भारावून गेले होते. होम मैदानावर आयोजित या मेळाव्यात तरुणाईचा उत्साह, आनंद व जल्लोष दिसून येत होता. तरुणांची गर्दी पाहता गड्डा यात्रेचे आठवण येत होती. प्रारंभी संघटनेचे संस्थापक नीतेश राणे यांच्या हस्ते मेळाव्याचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हा संघटक सागर यादव, महाराष्ट्राचे प्रवक्ते जगदीश बाबर, शहर संघटक सुभाष पाटील, मराठवाडा विभागाचे मनोज यादव, सुनील खटके, पुणे विभागाचे सचिन सातपुते आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक जयवंत कोकाटे यांनी केले.

माहितीची सुव्यवस्थित दालने
रोजगार मेळाव्यात 30 विविध कंपन्या आणि त्यांच्या उपविभागांची दालने उभारण्यात आली होती. या दालनांच्या अग्रभागी दालन क्रमांक, कामाचा प्रकार, नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि उपलब्ध पदांच्या संख्यांचे फलक ठळक अक्षरात लावण्यात आले होते. त्यामुळे उमेदवारांना सुलभता होत होती.

नियुक्तीपत्र मिळताच जल्लोष
जागेवर नियुक्तीपत्रे देण्यात येत असल्याने तरुण-तरुणींमध्ये एकच उत्साह दिसून येत होता. हातात नियुक्तीपत्र पडताच तरुण-तरुणी आनंदाने ओरडत मंडपाबाहेर पडत आपल्या मित्र-मैत्रिणी आणि आप्तेष्टांना मिठी मारत होते. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. रविवार असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी दिसत होती.

तरुणाईच्या वाढत्या प्रतिसादामुळे वाढवल्या जागा
''स्वाभिमान संघटनेतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 5400 जणांना नोकर्‍या मिळणार होत्या. परंतु तरुणाईचा वाढता प्रतिसाद पाहता ही संख्या वाढवण्यात येऊन तब्बल 6120 जणांना नियुक्ती पत्र देण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. सात हजार रुपयांपासून 22 हजार रुपयांपर्यंतच्या विविध नोकर्‍यांचा यात समावेश होता. सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध राज्यांत असणार्‍या नोकर्‍यांकरिता अर्ज मागवण्यात आले होते.’’
-सुभाष पाटील, शहर संघटक

तरुणीने घेतली आघाडी
रोजगार मेळाव्यात पहिला रोजगार मिळवण्यात एका तरुणीने आघाडी घेतली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी येथील शाहिस्ता तांबोळी या युवतीला पुण्याच्या अलाईड रिसोर्समध्ये सात हजार 100 रुपये मासिक वेतनाच्या नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. सोलापूरच्या मेळाव्यातील पहिली नियुक्ती होती

बेकारी निर्मूलन हा हेतू
‘‘तरुणाईच्या हाती रोजगार असायला हवा. त्यांच्या भविष्यातील वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रभरात होत असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल अभिमान वाटतो. तरुणाईचा वापर स्वार्थासाठी, स्वत:चे राजकीय दुकान चालवण्यासाठी न करता बेकारी निर्मूलन करणे या उद्देशाने रोजगार मेळाव्याची सुरुवात झाली. तरुणांसाठी एक वेगळा आदर्श उभा करण्याचा यामागील हेतू असल्याचे राणे यांनी सांगितले.’’