आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Encroachment Demolished By Commissioner Chandrakant Gudewar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्‍त चंद्रकांत गुडेवारांनी केले होटगी रस्‍त्‍यावरील अतिक्रमणे साफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात झालेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शनिवारी हाती घेतली. माजी महापौर मनोहर सपाटे अध्यक्ष असलेल्या संस्थेचे गाळे पाडून सकाळी कारवाईचा शुभारंभ झाला. त्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमेचा ताफा व्हीआयपी रोड समजल्या जाणार्‍या होटगी रस्त्याकडे वळला. दुकानांसमोरील अतिरिक्त बांधकाम, पत्रा शेड, मंडप, खोके, दुकानाचे फलक, बेकायदा बांधकाम अशा 100 मिळकतींवर जेसीबी चालली. यावेळी काही दुकानदार स्वत:हून साहित्य काढत होते. तत्काळ खोके काढणार्‍यांना काही काळ संधी देण्यात आली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली कारवाई सायंकाळी चारपर्यंत चालली. महावीर चौक ते मुलतानी बेकरी दरम्यान दोन्ही बाजूस असलेल्या 125 मिळकतींना महापालिकेने सोमवारी तीन दिवस मुदतीची नोटीस दिली होती.

चांगले झाले; यामुळे पार्किंग जागा झाली
माझ्या प्रभागातील अतिक्रमण महापालिकेने काढले ते चांगले झाले. त्या ठिकाणी वाहने पार्किंगसाठी जागा निर्माण झाली. त्यामुळे अपघात कमी होतील. आयुक्तांनी चांगले काम केले. हारून सय्यद, उपमहापौर

दंड आकारून रीतसर करता आले तर करा
आयुक्त त्यांच्या पद्धतीने काम करताहेत. जे बांधकाम दंड आकारून नियमित करता येत असेल ते करावे. त्यांच्या कामकाजात महापालिका पदाधिकारी हस्तक्षेप करणार नाहीत. महेश कोठे, मनपा सभागृह नेते

गरजेनुसार होणार पुढील कारवाई
ही मोहीम गरजेनुसार योग्य ठिकाणी करण्यात येईल. होटगी रोडवर 100 टक्के मोहीम राबवण्यात येईल. सोमवारी त्याबाबत आढावा घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त

पुढे काय?
आयुक्त गुडेवार यांनी सुरू केलेल्या कारवाईची स्तुती होत आहे. इतर भागातील बेकायदा बांधकामाचे काय? अनेक बडे लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांची अवैध बांधकामे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) येथे अतिक्रमण आहे. सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्ता आणि शहराच्या मध्यवर्ती भागात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यावर कारवाई होणार का?

बघ्यांची गर्दी अन् गुडेवारांची स्तुती
आसरा परिसरात अतिक्रमण काढत असताना मोठी गर्दी होती. रस्त्यावरून जाणारे नागरिक आयुक्त गुडेवार यांची कारवाई असल्याचे म्हणत होते. बरे झाले अतिक्रमण काढले, पण त्याचे पुन्हा होणार काय? असा प्रश्न करत पुढे जात होते. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. चौकात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

यांचे अतिक्रमण पाडले
नागदेव टेक्स्टाईल, पेठे लोणचे, मदिना टी हाऊस, शिवा कॅन्टीन, चौधरी फोटो स्टुडिओ, शिवनेरी झुणका भाकर केंद्र, मदिना हॉटेल, जी हॉटेलसमोरील पान टपरी, वाईन शॉपसमोरील अतिक्रमण, आसरा चौकातील अतिक्रमण, रूपम हेअर स्टाईल, मोरे चहा कॅन्टीन.