आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणाविरुद्ध रेल्वेचा नवा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बंद मीटरगेजच्या जागेवर अतिक्रमण होत आहे. ते काढण्याचा प्रयत्न केल्यास काही राजकीय नेते मतांवर डोळा ठेवून बेकायदा कामास पाठीशी घालत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या कारवाईस विरोध करत आहेत. त्यामुळे सोलापूर रेल्वे प्रशासनाने नवा फंडा शोधून काढला आहे. मीटरगेजच्या जागेवर ब्रॉडगेज टाकण्याचा!

सोलापूर-होटगी दरम्यान असलेल्या मीटरगेजच्या लाइनच्या जागेवर हे काम होणार आहे. हे काम झाल्यास रेल्वेला जादा लाइनचा फायदा होणार आहे. सोलापूर रेल्वे विभागाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे प्राथमिक मंजुरीसाठी तसा प्रस्ताव पाठवलेला आहे. मंजुरीबाबत सोलापूर प्रशासन आशावादी आहे. मुख्यालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यास कामाचे तपशील आणि खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सोलापूर ते होटगी दरम्यान तिहेरी रेल्वेलाइन येईल. सोलापूर विभागाला याचा मोठा फायदा होणार आहे. अंतर सुमारे 17 किलोमीटरचे आहे.

रेल्वेचे उत्पन्न वाढेल : मालगाडीची वाहतूक या मार्गावरून ठेवल्यास ती थेट बाळे स्थानकापर्यंत जाईल. बाळे येथे मालधक्का आहे. त्याचा मोठा फायदा मिळेल. मालगाडीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात तर वाढ होईलच शिवाय उद्योजकांना देखील याचा फायदा मिळणार आहे.

मंजुरीसाठी प्रयत्न
सोलापूर रेल्वे विभागाने नव्या रेल्वे लाइनचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवला आहे. तो मान्य झाल्यास सोलापूर रेल्वे विभागाला खूप मोठा फायदा मिळणार आहे. मंजुरीसाठी प्रयत्नशील आहोत.’’ सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय दळण-वळण व्यवस्थापक

फायदे काय?
* रेल्वेला लाइन टाकण्यासाठी हजारो कोटी रुपयांची जागा विकत घ्यावी लागते. मात्र, येथे रेल्वेच्या मालकीची जागा आहे.
जागेत अतिक्रमण झाले असून, ते वाढत चालले आहे. त्यास मतांवर डोळा ठेवून काही नेते बेकायदा गोष्टींना पाठीशी घालत अतिक्रमण काढण्यास विरोध करत आहेत. आता अतिक्रमण काढले तर पुन्हा भविष्यात त्याची समस्या उद्भवणार नाही असे नाही.
* अक्कलकोट किंवा होटगीपासून लोकल सुरू करणे शक्य होणार आहे. ती पुढे दौंडपर्यंत नेता येईल.
* तिहेरी लाइन असल्याने मेल एक्स्प्रेस, मालगाडी, लोकल यांना नव्या रुळावरून आणणे सहज शक्य होईल.
* लोकल व मेल एक्स्प्रेस या लाइनवरून सुरू झाल्याने मेन लाइनचा ताण हलका होईल.
* गाड्यांच्या क्रॉसिंगचा वेळ वाचणार आहे. सर्व गाड्या वेळेवर धावतील.