आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजापूर वेस झाली मोकळी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेचे अतिक्रमण प्रतिबंधक पथक आणि वाहतूक नियंत्रण पोलिस शाखा यांच्या संयुक्त कारवाईत विजापूर वेस परिसरातील अतिक्रमण सोमवारी हटवण्यात आले. त्यानंतर परिसर मोकळा आणि मोठा झाल्याचे वाटत होते.

कारवाईवेळेस अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. साहाय्यक आयुक्त मोरेश्वर अत्राम यांनी उभे राहून अतिक्रमण काढले. या वेळी विरोध करणार्‍यांची त्यांनी समजूत काढली.

बसस्थानक परिसरात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणारे वाहतूक शाखेचे पोलिस आणि महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने विजापूर वेस परिसरातील अतिक्रमण, रस्त्यावर टाकलेली वाळू, खडी काढली. विशेष म्हणजे चौकातील कधी न निघणारे सुमारे 15 डिजिटल फलक काढले. अनधिकृत खोके, व्यावसायिक फलक काढले. त्यामुळे चौक मोठा झाल्याचे वाटत होते.

सर्वसामान्य नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतो, नुकसान करू नका अशी विनंती केली. त्यामुळे त्यांना वेळ दिला. रिक्षा ट्राली आणून खोके न्या असे सांगून अतिक्रमण काढण्याची संधी अत्राम यांनी दिली. महापालिकेचे अधिकारी बी. बी. भोसले, नजीर शेख, वसंत पवारसह सुमारे 15 कर्मचारी मोहिमेत होते.

अत्रामांचा झाला सत्कार
श्री. अत्राम यांच्या मोहिमेमुळे विजापूर वेस स्वच्छ झाली. त्याबद्दल तेथील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. या कारवाईसाठी धन्यवाद देत तेथील लोकांनी साहाय्यक आयुक्त अत्राम यांचा उत्स्फूर्तपणे जाहीर सत्कार केला. ही मोहीम अशीच सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आली.

एसीपी अत्राम यांचा धडाका सुरूच
बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर अत्राम यांचा धडाका सुरूच आहे. शिवाजी चौकानंतर सोमवारी विजापूर वेस परिसरातील अतिक्रमण व वाहतुकीला अडथळा येतील असे वाहने, हातगाडी विक्रेते यांना हटवले. उद्या मंगळवारी रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटविणे, शिस्तीत रिक्षा, दुचाकी लावण्यासाठी मोहीम घेणार आहे.

सिग्नलबाबत सोमवारी महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांच्या दालनात श्री. अत्राम यांनी बैठक अयोजिली होती. पण तांत्रिक कारणामुळे ती झाली नाही. मंगळवारी ही बैठक आहे. मुख्य बाजारपेठ, सिग्नल चौक, मुख्य रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत राहतील याबाबत नियोजन आहे. काही दिवसांत नक्कीच बदल दिसतील असे श्री. अत्राम म्हणतात. सोमवारी रेल्वे स्टेशन चौकात पोलिस निरीक्षक वाय. बी. शिर्के व त्यांच्या पथकाने इंद्रायणी एक्स्प्रेस आल्यानंतर रिक्षा, दुचाकी वाहने यांना शिस्त लावण्यासाठी मोहीम राबविली. मंगळवारीही हे काम राहील.

कोण आहेत अत्राम?
श्री. अत्राम हे नागपूर-विदर्भातील रहिवासी. 1983 मध्ये ते फौजदार झाले. 1993 मध्ये निरीक्षक म्हणून नागपूर शहर व ग्रामीणमध्ये काम केले आहे. नंदूरबार (अकलबुवा) या डोंगरी भागात उपअधीक्षक होते. 2007 मध्ये नागपूर पोलिस ट्रेनिंग सेंटरमध्ये उपप्राचार्य, राज्य राखीव दल गट चारचे प्राचार्य होते. याशिवाय अमरावती, भंडारा, नागपूर या भागात सेवा बजावून 22 ऑगस्ट 2012 ला त्यांची सोलापुरात बदली झाली तेव्हापासून ते नियंत्रण कक्षात होते. मागील आठवड्यात त्यांना वाहतूक शाखेचा पदभार मिळाला. त्यांच्याकडे चांगल्या कामाची हातोटी आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात. धाडसी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.