आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटवलेल्या रस्त्यांवर पालिकेच्या परवानगीने कमानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या काळात येथे येणार्‍या 10 ते 12 लाख भाविकांना सहजपणे ये - जा करता यावे, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पालिका व महसूल खात्यामार्फत संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अतिक्रमण हटवलेल्या रस्त्यांवरच कमानी उभारून पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. यासाठी परवानगी देण्यात आल्याने पालिकेच्या कृपेने हे सुरू आहे. रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने व दुचाकी वाहनेही लावली जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.

गेल्या 10 दिवसांपासून व्यापार्‍यांनी रस्त्यांवर केलेली अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. पोलिस बंदोबस्तात तहसीलदार सचिन डोंगरे, मुख्याधिकारी रवींद्र जाधव, मुख्य अभियंता सुभाष भावी यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू आहे. जेसीबीद्वारे दुकानांच्या पायर्‍या, कट्टे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण दूर झाल्याने ते प्रशस्त दिसू लागले आहेत. शहरवासीयांतूनही या मोहिमेचे स्वागत होत आहे. मात्र, या मोकळ्या रस्त्यांवर यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांच्या जाहिराती व भाविकांच्या स्वागताच्या कमानी उभ्या राहत आहेत.

एकीकडे भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासन पालिकेला कोट्यवधींचा निधी देत आहे. तर दुसरीकडे पालिका मात्र शे, दोनशे रुपयांच्या भाड्यासाठी शहराच्या सौंदर्याला बाधा आणणार्‍या आणि वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या स्वागत कमानी उभारण्यास परवानगी देत आहे. पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेविषयी शहरवासीयांतून संताप व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसांत स्वागत कमानी न हटविल्यास पुन्हा अतिक्रमण करण्याचा इशारा दुकानदार व व्यापार्‍यांनी दिला आहे.