आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाकडे दुर्लक्ष: शहरात वृक्षारोपण करण्यासाठी मनपाकडे नाहीत रोपे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राज्यात एक कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प राज्य शासनाने केलेला असताना शहरात वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेकडे रोपे नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यापूर्वीच रोपे लावून त्यांचे संवर्धन होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात पावसाळा सुरू झालेला असताना वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मनपाचे दहा लाखांचे वृक्ष खरेदी टेंडर लालफितीत अडकल्याने रोपांची खरेदी थांबली आहे. आता मनपा उद्यान विभागाकडे फक्त दीड हजार रोपे आहेत. त्यामुळे वृक्षारोपण करण्यासाठी खासगी नर्सरीकडून विकत घ्यावे लागणार आहे. भुरेलाल कमिटीच्या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषण असलेल्या शहरात सोलापूर देशात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सोलापूरला महागडे युरो फोरचे पेट्रोल लागते. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज असताना मनपाकडे रोपे नाहीत.
शाळा, संस्थांना देण्यासाठी मोजकीच रोपे
मनपा उद्यान विभागाकडे फक्त दीड हजार वृक्ष रोपे असल्याने ते कोणाला द्यायचे हा प्रश्न आहे. खासगी संस्था, शाळेने वृक्ष मागितल्यास 10 ते 20 रोपे दिले जातात. मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करणार्‍यांना अडचणी येत आहेत.
टेंडर अडकले तांत्रिक अडचणीत
पावसाळ्यात शहरात वृक्षारोपण करण्यासाठी आंध्र प्रदेशातील राजमंडरीहून वृक्ष आणण्यासाठी दहा लाखांची तरतूद माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केली होती. थेट वृक्ष आणण्यासाठी तांत्रिक अडचण आल्याने जाहीर प्रसिद्धीकरण करून मक्ता मागवण्यात आला. त्यास मक्तेदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वेळेत वृक्ष आणता आले नाहीत. ही टेंडर प्रक्रिया लालफितीत अडकली कर्मचारी आणि कॅरिबॅग नसल्याने वृक्षारोपण नाही मनपा उद्यान विभागात वृक्षारोपण करण्यासाठी कर्मचारी नाही. दोनच कर्मचारी असल्याने काम थंडावले. वृक्षारोपण करण्यासाठी प्लास्टिक पिशव्या उपलब्ध नसल्याने काम ठप्प झाले. तसेच उद्यान विभागाचेही या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसते.
दीड हजार वृक्ष आहेत
आमच्याकडे दीड हजार वृक्ष रोपे आहेत. दहा लाखांचे वृक्ष खरेदीचे टेंडर दोन दिवसांत मंजूर होईल. त्यानंतर मक्तेदारांकडून तत्काळ वृक्ष रोपे पुरवठा होईल. मनपा उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले असून, त्यांची वाढ होताच पुरवठा केला जाईल.’’ स्वप्नील तारू, मनपा उद्यान विभागप्रमुख