आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम मशीनची तपासणी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी लागणा-या ईव्हीएम मशीन (मतदान यंत्र) उत्तर प्रदेशमधून मागविण्यात आल्या आहेत. या मशीन्स शनिवारी सायंकाळपर्यंत सोलापुरात पोहोचतील. यानंतरच लगेच सोमवार (दि. 11) पासून या यंत्राची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.
यासाठी हैदराबाद येथील अभियंत्यांचे खास पथक बोलाविण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर दोनच महिन्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनस्तरावर सुरू झाली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून ईव्हीएम मशीन उपलब्ध करून घेणे व त्याची प्राथमिक तपासणी या गोष्टी करण्यात येत आहेत. मशीन उत्तर प्रदेशातून उपलब्ध करण्यात आल्या असून, त्या सोलापुरात शनिवार (दि. 9) पर्यंत पोहोचणार असल्याचे प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी सांगितले. या मशीन रामवाडी येथील शासकीय गोदामामध्ये ठेवण्यात येणार आहेत. यानंतर लगेचच सोमवारपासून या निवडणूक यंत्राची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी साधारणत: एक आठवडा चालणार आहे.

गोदामाची पाहणी
मशीन्स शनिवारी सोलापुरात येणार असल्याने प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी गुरुवारी रामवाडी येथील गोदामाची पाहणी केली. पावसाचे दिवस असल्याने गोदामात गळती होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.

अधिकारी दिल्लीत
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे हे दिल्लीला गेले. मुख्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे विशेष प्रशिक्षण व बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक शनिवारपर्यंत चालणार आहे. राज्यस्तरावरील निवडणूक आयोगाची लगबग पाहता लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.